मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर (Income tax) विभागाची कारवाई सुरू आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. याला भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरे किंवा कार्यालयांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांचा संबंध भाजपाशी जोडणे हास्यास्पद आहे. तसेच, लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे मारण्यात आल्याचा दावा म्हणजे मोठाच विनोद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल राज्यातील विविध ठिकाणी आयकर विभागाने मारलेले छापे गेले सहा महिने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे आहेत, असे त्या विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अशा स्थितीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत शरद पवार यांनी खंबीर भूमिका घेतली म्हणून छापासत्र झाले असावे, असे सांगणे हा मोठाच विनोद आहे. राज्यातील २५ निवासस्थाने आणि १५ कार्यालयांवरील छापे हे एकदोन दिवसांच्या तयारीने होऊ शकत नाही. आयकर विभागाने याबाबत बरीच तयारी केली असावी हे या कारवाईच्या व्यापक स्वरुपावरून दिसते.
आयकर विभाग ही स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा आहे. ती तिच्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत काम करत असते. आयकर विभागाने काही आर्थिक व्यवहार उघडकीस आणले तर त्याला कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे. अशा छाप्यांचा संबंध भाजपाशी जोडून राजकीय रंग देणे आणि त्या आधारे स्वतःला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. दौंड शुगर, आंबलिक शुगर, जरंडेश्वर साखर, पुष्पदंतेश्वर शुगर,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर ही कारवाई केली. राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन आयकर विभागाने ही कारवाई केली.