मुंबई : मुंबईत हंटा व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यानंतर मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. उंदराच्या मुत्रातून, विष्ठेतून हंटा व्हायरसचा प्रसार होतो. श्वसनावाटे आणि उंदराच्या हंटा व्हायरस असलेल्या मुत्राशी, थुंकीशी, विष्ठेशी संपर्क आल्यास हंटा व्हायरसची लागण होण्याचा धोका असतो. हंटा व्हायरस नामक दुर्मिळ व्हायरसमुळे ‘हंटा व्हायरस पल्मनरी सिंड्रोम’ हा आजार होतो. उंदराला हंटा व्हायरसची लागण झालेली असल्यास त्याच्या मुत्रातून, विष्ठेतून हंटा व्हायरस बाहेर पडतो. हा हंटा व्हायरस हवेत मिसळला आणि त्याच हवेत श्वास घेतल्यास हंटा व्हायरस शरीरात जातो. तर, काहीवेळा हंटा व्हायरस हा तोंडावाटे, डोळ््यावाटेही शरीरात जातो. हा व्हायरस श्वसन प्रक्रियेवर परिणाम करतो, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. आदित्य अग्रवाल यांनी सांगितले. मुंबईत ज्या १२ वर्षीय मुलाला हंटा व्हायरसची लागण झाली होती, त्याला ताप आला होता आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. खोकला ही झाला होता. त्याची मूत्रपिंडे निकामी झाली होती. त्याच्या फुफ्फुसात रक्त जमा झाले होते तसेच खोकताना रक्त पडत होते. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हंटा व्हायरसपासून बचाव करायचा असल्यास अनवाणी चालणे टाळावे, असे डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले. हंटा व्हायरसची लागण झाल्यावर प्रमुख लक्षणे म्हणजे श्वासोच्छ्वासाला त्रास होतो. थंडी वाजून ताप येतो तसेच डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणेही आढळून येतात. काहीवेळा हंटा व्हायरसची लागण अधिक प्रमाणात झाल्यास डायरियाचा ही त्रास जाणवू शकतो, असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)> लक्षणांचा कालावधी १ ते ५ आठवडेहंटा व्हायरसचा संसर्ग झाल्यावर लक्षणे आढळून येण्याचा कालावधी हा १ ते ५ आठवडे इतका आहे. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला या व्हायरसची लागण झाल्याची नोंद अद्याप झालेली नाही. हंटा व्हायरसची लागण झालेल्या उंदाराच्या विष्ठेतून, मुत्रातून, थुंकीतून या व्हायरसचा प्रसार होतो. हंटा व्हायरसची लागण झाल्यावर काही दिवसांनी रुग्णाला श्वास घ्यायला जास्तच त्रास होतो. >मुंबईत २०१२मध्ये पहिला रुग्ण१९९३ मध्ये यूएसमध्ये पहिल्यांदा हंटा व्हायरसचा रुग्ण आढळून आला होता. आशिया खंडात गेल्या १० वर्षांपासून काहीठिकाणी हंटा व्हायरसचे रुग्ण आढळूनआले आहेत. वेल्लोर, चेन्नई, कोचीन आणि मुंबईत २०१२ मध्ये मुंबईतला पहिला रुग्ण आढळून आला होता.
उंदराच्या मूत्र आणि विष्ठेतून पसरतो हंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 4:09 AM