ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - चित्रपट निर्माता करण जोहर पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. करण जोहर यानं पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार घालून दहशतवाद संपणार नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. "उरीमधील दहशतवादी हल्ल्यामुळे माझ्याही मनाला वेदना झाल्या आहेत. देशाचा राग मी समजू शकतो. मात्र पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार घालणं हे योग्य नाही. पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार घालून दहशतवाद संपणार नाही," असं करण जोहर म्हणाला आहे.
मनसेने पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर चालते होण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर करण जोहरनं ही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. करण जोहर म्हणाला, "या हल्ल्याबाबत व्यक्त होणारा राग आणि असंतोष मी समजू शकतो. या हल्ल्यात शहीद झालेल्यांसाठी मला फार दु:ख वाटत आहे. या दहशतवादी कृत्याचे कोणीही समर्थन करू शकणार नाही. पण पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही, असंही तो म्हणाला आहे.
तुम्हाला हात जोडून इतकेच सांगावेसे वाटते की, आम्ही कला विश्वाशी संबंध असणारी माणसं आहोत. आम्हाला कृपा करुन एकटे सोडा. आम्ही चित्रपट बनवतो. आमच्या कामातून आणि चित्रपटांच्या माध्यमातून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. त्यामुळे आमच्यावर निशाणा साधणे कृपया बंद करावे, असं म्हणत करण जोहरनं मनसेला लक्ष्य केलं आहे. २८ ऑक्टोबरला करणचा आगामी चित्रपट ए दिल है मुश्किल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा यांच्यासह पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही झळकणार आहे. राजकारण आणि कलाकारांच्या पाकिस्तान परतीचा वाद असला तरीही प्रेक्षकांमध्ये मात्र या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.