जेजुरी (पुणे) : राजमाता अहिल्यादेवींसारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना जातीजातीमध्ये विभागले जात आहे, हे दुर्दैवी आहे. बहुजनांना एकाच छत्राखाली आणून जातीयवाद नष्ट करण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केले.मार्तंडदेव संस्थानच्या वतीने जेजुरीगडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १२ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर गड पायथ्यालगतच्या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याच्या लोकार्पणप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. संभाजीराजे होते. होळकर संस्थानचे युवराज यशवंतराजे प्रमुख पाहुणे होते.पवार म्हणाले, अहिल्यादेवी आजच्या पिढीच्या स्त्री शक्तीच्या प्रतीक आहेत. त्यांनी सत्तेचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी केला. त्यांच्याच आदर्शानुसार आपण महिलांच्या ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. देश, समाज पुढे न्यायचा असेल तर महिलांना सहभागी करून घ्यायलाच हवे. एका महान राजमातेच्या वंशात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे, असे यशवंतराजे म्हणाले.
‘...तर दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो’जेजुरीमध्ये शुक्रवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो.