विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत. कुटुंबीय आणि पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. नॉट रिचेबल होण्यापूर्वी त्यांनी धाय मोकलून रडत उद्धव ठाकरे यांची माफीही मागितली. यासंदर्भात बोलताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेतले होते. लोकसभाही लढवली होती. पण दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. पश्चाताप झालाय आता घरी बसा, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
राऊत म्हणाले, "हे जे वनगा नावाचे गृहस्त आहेत, आमदार झाले ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी त्यांना लोकसभाही लढवली. भाजपने दुर्लक्ष केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेऊन, या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले, ताकद लावली आणि स्वतः प्रचारात दाखल झाले. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा, अशी त्यांची भूमिका होती.
तेव्हा त्या भागातील अनेक शिवसैनिकांनाही रडू कोसळलं होतं -"श्रीनिवास वनगा हे आमदार झाले ते काही एकनाथ शिंदेंमुळे नाही. ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झाले. पण हे महाशय सुरतला गेले, गोहाटीला गेले, गोव्याला गेले, कुठल्यातरी टेबलावर आम्ही त्यांना नाचतानाही बघितलं. तेव्हा त्या भागातील अनेक शिवसैनिकांनाही रडू कोसळलं होतं. आता ही कर्माची फळं असतात. ती अनेकांना भोगावी लागतील. उद्धव ठाकरे हे देव माणूस आहेत, हे तुम्हाला आता पटलं, आहेतच. त्यासाठी इतर कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही," असेही राऊत म्हणाले.
पश्चाताप झालाय घरी बसा -जर वनगा यांना केलेल्या चुकीचा पश्चाताप होत असेल, तर मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात? असा प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले, हा प्रश्न तुम्ही कशासाठी विचारताय या प्रश्नाला काय अर्थ आहे? पश्चाताप झालाय घरी बसा.