मनीषा म्हात्रे,
मुंबई- अल्पवयीन मुली विक्रीच्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपी पोटच्या मुलीला पाच हजारांना विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. दिलीप मनीराम धुरीया (३३) असे या आरोपींचे नाव असून, त्याच्यासह या प्रकरणात सहा जणांना मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.मूळचा उत्तर प्रदेशातील छबवा गावातील रहिवासी असलेला दिलीप मुलुंडच्या अशोकनगर परिसरात राहतो. पाच वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला. आईवडिलांच्या निधनानंतर मोठ्या भावासोबत तो राहायचा. दारू पिऊन धिंगाणा घालणे, घरातच चोरी करणे या त्याच्या दिनक्रमामुळे घरच्यांनीही त्याला दूर केले. अशात तो पुन्हा गावी निघून गेला. त्याची पत्नी आणि दोन मुले गावीच असतात. त्याची मुलगी अवघी आठ महिन्यांची आहे. घरखर्च त्यात मुलीचा बोजा, यामुळे मुलीच्या जन्मापासूनच त्याला ती ‘नकोशी’ झाली होती. त्यानंतर, ६ महिन्यांपूर्वी कामानिमित्त तो मुंबईत आला. घरच्यांनी हाकलल्याने गेल्या काही दिवसांपासून तो दोन मित्रांसोबत भाडे तत्त्वावर राहायचा. त्याचा रूम पार्टनर असलेला तुफान बिहारीलाल निशाद (३३) याने त्याला या टोळीबाबत सांगितले. मुळात एका मुलीमागे ते ५५ ते ६० हजार रुपये देत असल्याची माहिती त्याला दिली. एवढी रक्कम ऐकून त्याची नियत फिरली. त्याने आपल्याही मुलीला विकण्याचा विचार त्याच्यासमोर मांडला. किमान काहीतरी उपयोग होईल, असे सांगून तिला अवघ्या पाच हजारांत विकण्याची तयारी दर्शविल्याची माहिती समोर आली.>पहिला प्रयत्न यशस्वीया आधी दिलीप याने आपल्याच नात्यात असलेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीच्या चोरीचा डाव आखला. तिचे अपहरण करत तिला या टोळीच्या स्वाधीन केले. पहिला प्रयत्न यशस्वी झाल्याने, त्यानंतर तो त्याच्या मुलीला विकण्यासाठी गावाकडे जाणार होता. मात्र, त्या पूर्वीच मुलुंड पोलिसांच्या पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला.