ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २७ - माणूस मारला म्हणून एकाला अटक...वाघ मारला म्हणून एका जणावर गुन्हा दाखल झाला, अशा घटना आपण नेहमीच वाचतो आणि एकतो... परंतु एखाद्या कुत्र्याला काठी, दगड मारला तर त्याच काय ऐवढे विशेष, असे कुणीही म्हणेल. मात्र, शेजाऱ्याच्या कुत्र्याच्या पिल्लाला साधी काठी मारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. काठीच्या एकाच फटक्यात पिल्लाचा जीव गेला अन् या तरुणावर प्राण्याच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला. ही घटना घडली ती औरंगाबादेतील मुकुंदवाडी परिसरातील जे सेक्टरमध्ये...कुत्र्याची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव शुभम मधुकर काळे (२२, रा. जे सेक्टर, मुकुंदवाडी) असे आहे. त्याचे झाले असे की, जे सेक्टरमधील रहिवासी अंजली भाऊलाल गणवास यांनी काही दिवसांपूर्वी एक सुंदर कुत्र्याचे पिल्लू आणले. या पिल्लाला त्यांनी पाळले. गणवास कुटुंबाला या पिल्लाचा चांगलाच लळा लागला होता. ते कुटुंबातील एक सदस्यच बनून गेले होते. मात्र, हे कुत्र्याचे पिल्लू काही शेजाऱ्यांच्या डोक्याला ताप बनले होते. शेजाऱ्यांच्या अंगणात जाऊन ते घाण करीत असत. रात्री भुंकत असे, त्यामुळे काही जण वैतागून गेले होते. दरम्यान, २६ जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास अंजली गणवास या खरेदीसाठी बाहेर गेल्या. त्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरी एकटेच होते. खेळत खेळत हे पिल्लू शेजारी राहणाऱ्या काळे कुटुंबाच्या अंगणात गेले आणि तेथे त्याने घाण केली. त्याच वेळी शुभम काळे हा घरातून बाहेत आला. त्या पिल्लाने घरासमोर घाण केल्याचे पाहताच त्याचे माथे भडकले. बाजूला पडलेली काडी त्याने उचलली आणि एक जोरदार फटका त्या पिल्लाला मारला... एकाच फटक्यात ते पिल्लू जमिनीवर कोसळले आणि क्षणातच गतप्राण झाले. नंतर शुभम तेथून निघून गेला.पावणे सात वाजेच्या सुमारास अंजली गणवास खरेदी करून घरी परत आल्या. दरवाजासमोरच आपले कुत्र्याचे पिल्लू निपचित पडलेले त्यांच्या नजरेस पडले. ते झोपले असावे, असे आधी त्यांना वाटले. जवळ जाऊन त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही हलेना. तेव्हा ते मरण पावलेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
प्रकरण पोलीस ठाण्यातआपल्या कुत्र्याला पिल्लाला आपण घरी नसल्याची संधी साधून कुणी तरी हेतुपुरस्सर मारून टाकले, याची अंजली गणवास यांना खात्री पटली. मग त्यांनी शेजारी पाजारी विचारपूस सुरू केली. तेव्हा बाजूला राहणाऱ्या शुभम काळेने काठीने पिल्लाचा जीव घेतल्याचे त्यांना समजले. तेथून सरळ अंजली गणवास यांनी मुकुंदवाडी ठाणे गाठले आणि आपल्या कुत्र्याला शेजारी राहणाऱ्या शुभम काळेने मारले आहे, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा, अशी मागणी केली.
काय गुन्हा नोंदवावा? पोलिसांसमोर प्रश्नमाणसाला मारणाऱ्याविरुद्ध काय गुन्हा नोंदवायचा, यासाठी पोलिसांना कायद्याच्या पुस्तकाची गरज पडत नाही. कारण दररोज अशा तक्रारी येताच असतात.मात्र, अंजली गणवास हा जेव्हा आपल्या कुत्र्याच्या पिल्लाच्या हत्येची तक्रार घेऊन आल्या तेव्हा पोलीसही चक्रावले. काय गुन्हा नोंदवावा, याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आपआपसात चर्चा झाली. अखेर कायद्याच्या पुस्तकाचा आधार घेण्यात आला. मग पुस्तकाच्या अधारे अंजली गणवास यांच्या तक्रारीवरून शुभम काळेविरुद्ध कलम ४२८ भादंविसह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१) (ठ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार साहेबराव गवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.