"सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचं हे शरद पवारांच्या घरी ठरलं होतं"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:34 AM2023-10-12T09:34:41+5:302023-10-12T09:35:21+5:30

भाजपासोबत सरकारमध्ये जायचे हे शरद पवारांच्या घरी ठरले त्यामुळे अचानक त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राजीनामा दिला होता असं भुजबळांनी म्हटलं.

"It was decided at Sharad Pawar's house to join BJP under the leadership of Supriya Sule" Says Chhagan Bhujbal | "सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचं हे शरद पवारांच्या घरी ठरलं होतं"

"सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचं हे शरद पवारांच्या घरी ठरलं होतं"

मुंबई – खरी राष्ट्रवादी कुणाची? यावर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटात वर्चस्ववाद सुरू आहे. राज्यात शरद पवार गटाने विरोधी बाकांवरच बसायचे ठरवले तर अजित पवार गटाने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते, त्यानंतर पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार भाजपासोबत जाणार नव्हते, परंतु मी राजीनामा देऊन सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनवतो, त्यानंतर तुम्हाला हवं ते करा हे बोलले, हे खरे आहे. परंतु पुढे १५ दिवस घरात चर्चा झाली. ही अजितदादांची माहिती आहे. शरद पवारांनी राजीनामा द्यायचा. त्यांनी राजीनामा दिला तर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करायचे. त्यानंतर आपण भाजपासोबत सरकारमध्ये जायचे हे शरद पवारांच्या घरी ठरले त्यामुळे अचानक त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राजीनामा दिला होता असं भुजबळांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते.

भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार

येवला इथं शरद पवारांनी सभेत भुजबळांना तिकीट देऊन चूक केली असं म्हटलं. शरद पवार म्हणाले होते की, मी आज इथं माफी मागायला आलोय. माझा अंदाज फारसा चूकत नाही, परंतु इथं माझा अंदाज चुकला असं म्हणाले होते. त्यावर भुजबळांनी पलटवार करताना सांगितले की, चुकलो म्हणजे काय, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता असताना मी तुमच्यासोबत आलो, तेव्हा कुणी तुमच्याबरोबर नव्हते. मी मजबुतीने उभा राहिलो. मी सांगू का माझी चूक झाली, अशा चूका मीपण खूप केल्या असं त्यांनी म्हटलं.

भुजबळांचे गौप्यस्फोट

  1. २०१४ ला वेगवेगळ्या निवडणुका लढण्याचे आधीच ठरले होते, भाजपानं शरद पवारांना सांगितले की, आम्ही स्वतंत्रपणे लढतो, तुम्ही काँग्रेसला सोडा, मग ४ पक्ष स्वतंत्र लढले. निवडणुकीनंतर काही दिवस भाजपा सरकार चालवेल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल असं आधीच ठरले होते ही पवारांची रणनीती होती.
  2. २०१७ मध्ये राष्ट्रवादी-भाजपात चर्चा झाली, कुणाला किती मंत्रिपदे, किती जागा, पालकमंत्री, महामंडळे किती सगळे काही ठरले. त्यानंतर मग शरद पवारांनी भाजपाला अट घातली की, आम्ही तुमच्यासोबत येतो, परंतु शिवसेना नको. त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वीही भाजपासोबत चर्चा झाली होती.
  3. शरद पवार, प्रफुल पटेल, अजित पवार, जयंत पाटील ही मंडळी भाजपासोबत चर्चा करत होती. शिंदे येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही हीच मंडळी भाजपासोबत चर्चा करत होती. अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला, भाजपासोबत चर्चेवेळी अजित पवार होते, अजित पवारांनी शब्द दिला होता, तो शब्द पूर्ण करण्यासाठी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला. ते बंड नव्हते तर आधी ठरले होते.
  4. अजित पवारांनी धोका दिला नाही तर अजित पवारांनी शब्द पूर्ण केला. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केले ते सत्य आहे. २०१९ ला पहाटेचा शपथविधीवेळी कुणी धोका दिला हे समोर आहे. अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही. जे मतभेद निर्माण झालेत ते मिटतील असं नाही.

Web Title: "It was decided at Sharad Pawar's house to join BJP under the leadership of Supriya Sule" Says Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.