मुंबई – बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी पुढे आले. शिवाजी पार्कच्या पहिल्याच भाषणात मी शिवसैनिक झालो. मुंबईत १५ शाखाप्रमुख झाले त्यातला मी एक होतो. माझे आईवडील नाहीत. बाळासाहेब आणि माँसाहेब यांना मी आई वडील मानायचो. शिवसेना एक कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रमुख बाळासाहेब होते. बाळासाहेब कधी चिडलेले पाहिले नाहीत अशा आठवणी मंत्री छगन भुजबळांनी जागवल्या.
बाळासाहेबांच्या अटकेवेळी काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करू असं आम्ही शिवाजी पार्कवर जाहीर केले होते. १९९३च्या दंगलीनंतर हा आयोग नेमण्यात आला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी हा अहवाल फेटाळला होता. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे सत्तेत होते तेव्हा शिवसेनेविरोधातील अनेक फाईल्स बंद केल्या होत्या. मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो. तेव्हा माझ्यासमोर फाईल आली. तेव्हा श्रीकृष्ण आयोगातील अनेक प्रकरणं आली होती. मी ज्या पदावर होतो तेव्हा मला ही कारवाई करावी लागली कारण श्रीकृष्ण आयोग आम्ही स्वीकारु असं आम्ही जाहीर केले होते. मला बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता. बाळासाहेबांना तुरुंगात न्यायचं नाही हे आमचं ठरलं होतं. त्यांनी जामीन मागितला तर जामीनला विरोधही करायचा नाही. पण कोर्टाने जामीन नाकारला तर मातोश्री जेल म्हणून जाहीर करायचं हे आम्ही ठरवलं होतं. गृहमंत्री असल्याने तसे अधिकार मला होते. एखाद्या वास्तूला जेल म्हणून जाहीर करू शकत होतो असं मंत्री छगन भुजबळांनी(Chhagan Bhujbal) गौप्यस्फोट केला. लोकमतला दिलेल्या फेस टू फेस मुलाखतीत छगन भुजबळांनी हे भाष्य केले आहे.
शिवसेना का सोडली?
शिवसेना(Shivsena) कधीही आरक्षणावर बोलत नव्हती. मी आमदार असताना मंडल कमिशनची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी वसंतदादांच्या अंगावर आम्ही धावून जायचो. मंडल आयोग आम्ही स्वीकारतोय असं तत्कालीन सरकारने जाहीर केले. तेव्हा मी कौतुक करणारं होतो. यू. पी सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केले. तेव्हा शिवसेनेत माझ्याविरोधात कुरबुरी सुरू झाली. बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंब नाशिकच्या घरी आले होते. तिकडे भटक्या विमुक्तांचा मोर्चा निघाला. तेव्हा बाळासाहेब कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात होते. पोटाला जात नाही असं बाळासाहेब नेहमी म्हणायचे. तेव्हा त्या बंगल्यावरून बाळासाहेब पत्रकार परिषद घेणार होते. आणि मी आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेत मोर्चात होतो. तेव्हा राज्यात आरक्षणाचा वाद पेटला होता. अनेक आमदार माझ्याकडे आले मंडल कमिशनसाठी लागू झालं पाहिजे असं त्यांनी मांडलं. ३६ आमदार माझ्यासोबत होते. त्यातील अनेक पळाले काही राहिले. शिवसेना सोडण्याचं कारण ठरलं. लोकसंग्रह वाढवणं हे त्याकाळी गरजेचे होते त्यामुळे शिवसेना-माझ्यात दुरावा निर्माण झाला. मी शिवसेना सोडली आणि समता परिषदेची स्थापना केली.
बाळासाहेब माझ्यावर प्रचंड चिडले होते
त्याकाळी एखाद्या नगरसेवकानेही शिवसेना सोडणं हे अत्यंत धोकादायक होतं. त्यात बाळासाहेबांचे माझ्यावर प्रेम होते त्यामुळे राग माझ्यावर प्रचंड होता. जे गेले ते गेले असं बाळासाहेब म्हणाले होते. ते फार चिडले होते. माझ्यासोबत आले होते त्यातील काही परतले. २५ वर्ष बाळासाहेबांनी मला जवळ केले होते. त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. तेव्हा सामनामध्ये छगन भुजबळ विटंबना करणारा नराधम अशी हेडिंग आली होती. त्यानंतर न्यायालयीन लढाईत मला क्लीनचीट मिळाली. त्यानंतर मी शिवसेनेविरोधात दावा दाखल केला. माझ्याकडे अनेक पुरावे होते. सुभाष देसाई, संजय राऊत माझ्याकडे आले तेव्हा मी मंत्री होतो. जेव्हा या केसची सुनावणी पूर्ण होत आली तेव्हा मी केस मागे घेतली. मी बाळासाहेबांची माफी मागितली. बाळासाहेबांनीही मोठ्या मनानं सगळं विसरून आम्हाला सहकुटुंब जेवायला बोलावलं. त्यानंतर कालांतराने हे सगळं विसरून आम्ही एकत्र आलो. आणि आता तर एकाच सरकारमध्ये काम करतोय असंही छगन भुजबळ म्हणाले.