मुंबई/बीड - अजित पवार यांनी बंडखोरी करत राज्यातील शिंदे-भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथही घेतली. तर, काही नेते हे शरद पवारांसोबत आहेत. मात्र, दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात येत आहे. तर, शरद पवार हेच आमचे प्रमुख असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे, लोकांमध्ये अद्यापही संभ्रमच आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून बॅनरवर शरद पवारांचाच फोटो लावला जातो, त्यामुळेही अनेकजण बुचकळ्यात पडतात. मात्र, आता या फोटोबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मी राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षासोबत द्रोह करून ज्या कुणी नवा निर्णय घेतला आहे, त्यांनी माझा फोटो वापरू नये. परवानगीशिवाय फोटो वापरणे हे योग्य नसून आपण कोर्टात खेचू, असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला होता. त्यानंतर, आता शरद पवारांचे फोटो न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. अजित पवार गटाच्या कार्यक्रमात किंवा सभास्थळी शरद पवारांचा फोटो न वापरण्याचे सांगण्यात आले आहे.
शरद पवार यांच्या बीडमधील सभेनंतर आता अजित पवार गटाकडूनही बीडमध्ये सभा घेत हालचाली सुरू आहेत. त्यातच, योगेश क्षीरसागर यांनी मुंबईत येऊन अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी, कार्यक्रमातील बॅनरवर कुठेही शरद पवारांचा फोटो नव्हता. तसेच, २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेसाठीही शरद पवारांचा फोटो न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी सभेपूर्वी एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातही कुठेही शरद पवार यांचा फोटो दिसून येत नाही. त्यामुळे, शरद पवारांच्या कोर्टाच्या इशाऱ्यानंतर हा फोटो लावण्यात येणार नसल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीत फूट नाही- सुळे
पुण्यामधील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. पक्षातील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केलेली आहे. अजित पवार हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पण, त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत.