खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही...; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 02:43 PM2023-07-05T14:43:57+5:302023-07-05T14:44:18+5:30
२०१९ मध्ये ५ बैठका एका उद्योगपतीच्या घरी झाल्या. मला आणि देवेंद्र फडणवीसांना कुठेही बोलायचे नाही हे सांगितले होते असं अजित पवार म्हणाले.
मुंबई – जर आम्हाला भाजपासोबत जायचं नव्हते तर २०१४ मध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले. २०१७ रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आम्ही सगळे बंगल्यावर चर्चा झाली. वरिष्ठांना सांगितले सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील बैठकीत होते. कुठली खाती, पालकमंत्री पदे ठरली. निरोप आला, दिल्लीत बोलावले. वरिष्ठांसोबत बैठक झाली. २५ वर्षाचा आमचा मित्रपक्ष त्याला आम्ही सोडणार नाही असं भाजपाने सांगितले. शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपा असे सरकार राहील असं भाजपाच्या वरिष्ठांनी सांगितले. तेव्हा शिवसेना नको, ती जातीयवादी आहे असं आमच्या वरिष्ठांनी सांगितले. त्यानंतर हे सर्व बारगळले असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
त्याचसोबत २०१९ मध्ये ५ बैठका एका उद्योगपतीच्या घरी झाल्या. मला आणि देवेंद्र फडणवीसांना कुठेही बोलायचे नाही हे सांगितले. पहाटेच्या शपथविधीला काय झाले हे मला अनेकदा विचारले. हे सर्व सुरू असताना अचानक बदल झाला आणि मला शिवसेनेसोबत जायचे हे सांगितले. २०१७ मध्ये शिवसेना नको असं म्हणत होते मग अचानक २ वर्षात असा काय बदल झाला, विचारांचे अंतर असू शकते. मतमतांतरे असू शकते. नेहमी वेगवेगळी भूमिका असं चालत नाही असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार भाषणात काय म्हणाले?
२०२२ मध्ये राष्ट्रवादीच्य आमदारांनी पत्र लिहून सरकारमध्ये जाण्याबाबत विचार मांडला होता.
आमदारांच्या मतदारसंघात कामे होत नव्हती. प्रफुल पटेल, जयंत पाटील आणि मी अशी कमिटी बनवली आणि भाजपाशी चर्चा करण्याचे सांगितले.
भाजपाने इंदूरला बोलावले. पण आम्हाला तिथे जाऊ दिले नाही. तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता.
मला लोकांसमोर व्हिलन केले जाते कळत नाही. माझ्याकडे सर्व आमदारांच्या सह्या आहेत. एकही खोटे बोलत नाही.