सोलापूर : युद्ध सुरू असताना सौनिकांवर औषधोपचार व त्यांची सेवा केली. त्या काळातील आमचा अनुभव तसा वाईट होता. कारण आमच्या डोळ्यांसमोर आमचे सैनिक जखमी झालेले आम्ही पाहत होतो. अशा वेळी भावनांवर नियंत्रण ठेवून काम करणे आमच्यासाठी गरजेचे होते, असा अनुभव मार्तंड दाभाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितला.
कारगिल येथील युद्ध ३१ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान सुरू होते. जखमी झालेल्या सैनिकांवर आम्ही प्रथमोपचार करत होतो. सैनिकांची प्रकृती खराब असेल तर त्याला हेलिकॉप्टरने श्रीनगर किंवा दिल्ली येथील रुग्णालयात पाठवत होतो. कधी कोणत्या परिस्थितीत आपला सौनिक येईल, हे सांगता येत नसायचे. जो समोर येईल त्याच्यावर प्रथमोपचार करणे हेच हाती असायचे. पुढील उपचारासाठी उधमपूर किंवा दिल्ली येथे सैनिकास पाठविल्यानंतर त्याचे काय झाले, हे आम्हाला कळायचे नाही. कुणाचा हात तर कुणाचा पाय धडापासून वेगळा झालेला असायचा. अशा रुग्णांवर विशेष प्रथमोपचार करावा लागायचा. रक्त वाहण्याचे थांबविणारे बँडेज व वेदना कमी करण्याचे इंजेक्शन यांचा जास्त वापर होत होता, असे मार्तंड दाभाडे यांनी सांगितले.
ते आता सोलापुरातील सैनिक कल्याण कार्यालय येथे कल्याण संघटक म्हणून काम करत आहेत. सैन्यात ३० वर्षे सेवा केल्याबद्दल त्यांना मानद कॅप्टन ही पदवी देण्यात आली आहे. ते मूळचे नाशिक येथील आहेत.
कारगिलमध्ये बॉम्बिंग नेहमीच व्हायचे..कारगिलमध्ये युद्ध सुरू असताना नेहमीच बॉम्बिंग होत होते. कारगिलमध्ये तणावाचे वातावरण होते. या काळात कुणीही सुरक्षित नसायचे, असा अनुभव कारगिल येथे सैन्याला रसद पुरविण्यासाठीचे कार्यालयीन काम करणाºया गुरुनाथ कुलकर्णी यांनी सांगितला. कारगिलपासून मुंजीगाव येथे आम्हाला जावे लागायचे. तेथून सात किलोमीटर अंतरावर पाकिस्तान दिसत होता. हा परिसर मोकळा असल्याने एखादा माणूसही सहज दिसत होता. त्यामुळे लगेच गोळीबार केला जात होता. पुढे लढणाºया सैनिकांना सक्षम ठेवणे, त्यांना रसद पुरविणे, रेशन (राशन) पुरवणे आदी आमचे काम होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले. गुरुनाथ कुलकर्णी हे सध्या सौनिक कल्याण कार्यालय येथे लिपिक म्हणून काम करत आहेत.