मुंबई – शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं राज्यातील राजकारणात पुन्हा काही हालचाली सुरू झाल्यात का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. यावेळी जयंत पाटीलही हजर होते. या भेटीबाबत कुणालाही काही कळवण्यात आले नाही. मात्र आता जयंत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देत ही गुप्त भेट नव्हती असं म्हटलं आहे.
जयंत पाटील म्हणाले की, भेटीबाबत काही विशेष सांगण्याची आवश्यकता नाही. ही गुप्त भेट नव्हती. मी शरद पवारांसोबत गेलो होतो. अजित पवार-शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही. कालच्या भेटीचा आणि ईडीच्या नोटिसीचा काही संबंध नाही. कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होण्याची गरज नाही. भेटीगाठी होत असतात. माझी भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे. असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत एका कंपनीच्या व्यवहाराबद्दल माझ्या बंधूंना ईडीटी नोटीस आली. ४ दिवसांपूर्वी ते चौकशीसाठीही गेले होते. ईडीने बोलावले, आवश्यक ती माहिती घेतली. त्याचा आणि कालच्या भेटीचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. सगळेच शरद पवारांचा फोटो लावतात. पवारांसाठी काम करतोय असं म्हणतायेत. त्यामुळे फूट पडल्याचे दिसत नाही. आम्ही तेच निवडणूक आयोगाला कळवलं आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, प्रत्येक आमदार मंत्री होऊ शकतो. मला ऑफर असल्याच्या बातम्या चर्चेत असतात. पण अशा बातम्या फारशा मनावर घेऊ नका. मी शरद पवारांसोबत आहे तुम्ही मनात काही विचार करू नका असाही मिश्किल टोला जयंत पाटील यांनी पत्रकारांना लगावला.
शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते
सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राजीनामा देऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच रोखले. वळसे-पाटील यांनीच याबाबतचा गौप्यस्फोट केला. ' हा प्रश्न व्यक्तिगत आहे, पण मला काम करायला सांगितले ही गोष्ट खरी आहे,' असे त्यांनी सांगितले. आम्ही शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते आहेत आणि राहतील, असेही त्यांनी संगितले.