कऱ्हाड : तालुक्यात खासगी सावकारांनी उच्छाद मांडला असतानाच अवघ्या पाचशे रुपयात सावकारीचे कायदेशीर ‘लायसन्स’ मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. निबंधक कार्यालयातून हा परवाना इच्छुकाला काढता येत असून कऱ्हाड शहरासह तालुक्यात १०१ परवानाधारक सावकार आहेत. त्याबरोबरच खासगी सावकारही गरजवंतांचे शोषण करीत आहेत.
उत्तर पार्लेतील शेतकऱ्याला ट्रक खरेदीसाठी व्याजाने पैसे देऊन त्या मोबदल्यात अवाच्या सवा व्याज वसुली करीत संबंधित शेतकऱ्याची जमीनच सावकारांनी हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पाच सावकार गजाआड झाले आहेत. यापूर्वीही अशाच पद्धतीने सावकारांनी गरजवंतांच्या मुंड्या मुरगाळल्याची प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. मात्र, वारंवार गुन्हे दाखल होऊनही तालुक्यातील खासगी सावकारी थांबत नसल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात परवानाधारक सावकार किती आणि सावकारीचा परवाना नेमका मिळतो कसा, याचा मागोवा घेतला असता, केवळ ५०० रुपयात कुणालाही सावकार बनता येते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कऱ्हाड तालुक्यातील १०१ जणांनी असा परवाना घेतला आहे. त्याबरोबरच बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांची संख्याही तालुक्यात अमाप आहे. खासगी सावकार शेतकऱ्यांसह गरजवंतांना प्रतिमहिना १० ते ३० टक्क्यांपर्यंत मनमानी व्याजाने पैसे देत असून, वसुलीवेळी संबंधितांचे जगणे मुश्कील करीत आहेत.
परवान्यासाठी काय लागतं..?
१) पोलिसांचा चारित्र्य पडताळणी दाखला
२) व्यवसायाची जागा स्वत:ची असावी.
३) जागा आईवडिलांची असेल तर त्यांचे संमतिपत्र.
४) भाडेतत्त्वावरील जागा असेल भाडेपट्टा करार.
५) पाचशे रुपयांचे चलन
६) प्रतिज्ञापत्रासह इतर कागदपत्रे
दर वर्षी नूतनीकरण
सावकारी परवान्याचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरण करताना वर्षात जेवढा व्यवसाय करणार त्यावर एक टक्के कर भरणा करावा लागतो. हा कर कमीत कमी पाचशे रुपये ते जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये असतो.
परवानाधारक सावकार
८७ : जुने
१४ : नवीन
१०१ : एकूण
... अशी चालते खासगी सावकारी
१) कोरे धनादेश : सावकार कोरे धनादेश, वाहनांची कागदपत्रं घेतात़
२) जागेवर वसुली : कर्ज देतानाच पहिल्या हप्त्यापोटी पैसे घेतात.
३) व्याजावरही व्याज : एखाद्या महिन्यात व्याज मिळाले नाही तर पुढे दर दिवसाला मुद्दल व व्याजावरही व्याज लावले जाते.
४) व्याजदर मनमानी : काही सावकार दहा टक्क्याने, तर काहीजण पंचवीस टक्क्यापर्यंत व्याज आकारतात.
दलालांना मिळते कमिशन!
बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांमध्ये काही ‘व्हाईट कॉलर’वाल्यांचाही समावेश आहे. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांनी दलाल नेमले असून, सावज शोधून त्याला सावकाराच्या दारात उभे करण्याचे काम दलाल करतात. त्यातून त्यांना कमिशन मिळते.