कोल्हापूर – शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अनेक वावड्या उठत आहेत. त्यात जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार अशी चर्चा होते. त्यात आता जयंत पाटलांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफांनी मोठा दावा केला आहे. आमच्यासोबत जयंत पाटीलही मंत्रिपदाची शपथ घेणार होते असं मुश्रीफांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर इथं पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, जयंत पाटलांसारख्या व्यक्तीने असं विधान हे अयोग्य होते. कारण एका घटनेमुळे ते थांबले, अन्यथा त्यांनी आमच्यासोबत शपथ घेतली असती. हे गोपनीय आहे. ज्यापक्षासोबत आम्ही गेलो आहोत त्यांच्याशी इमान ठेवणे हे आमचे काम आहे. आता आमची भूमिका बदलली आहे त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणे हे आमचे कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितले. तसेच जयंत पाटील एका घटनेमुळे ते थांबले, ही घटना मी तुम्हाला सांगणार नाही. वेळ आल्यावर सांगेन कारण मी राजकीय पथ्य पाळणारा माणूस आहे असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, जरांगे हे आंदोलनास बसल्यापासून सकल मराठा समाज आंदोलन करतायेत. मराठा समाजाच्या लोकांनी माझी भेट घेतली. मराठा समाजाने जेव्हा जेव्हा मोर्चे काढले तेव्हा आम्ही त्यात सहभाग घेतला. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळाले ही आमची भावना आहे. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांच्या काळात आरक्षण दिले होते. जे आरक्षण हायकोर्टात टिकले मात्र सुप्रीम कोर्टात टिकले नाही त्यामागे अनेक कारणे आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत अशी माहिती हसन मुश्रीफांनी दिली.
काय म्हणाले जयंत पाटील?
गॅस, पेट्रोल व वीजदरात वाढ झाल्यामुळे महागाईने मागील वर्षभरात परमोच्च बिंदू गाठला आहे. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. या सर्व प्रश्नांचे प्रतिकात्मक दहन करून नवीन सुरुवात करूया. गतवर्षी रावणाचे दहन करण्यासाठी इचलकरंजीत आलेल्या हसन मुश्रीफ यांना भाजपरुपी रावणाचे दहन करण्यासाठी मुद्दाम रावणाच्या जवळ पाठविले आहे. आता सर्वांनी मिळून भाजपरुपी रावणाचे दहन करूया असं म्हणत जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे मुश्रीफांवर निशाणा साधला होता.