ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 16 - भाजपच्या कवलापूर (ता. मिरज) येथील प्रचार सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हजेरी लावली आणि ती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. कवलापूर भगवा कुर्ता, गळ्यात भाजपचा मफलर आणि कपाळाला कुुंकूमतिलक अशा वेशभूषेतील त्यांच्या उपस्थितीने नवा संशयकल्लोळ निर्माण झाला.
भाजपशी सलगीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात सध्या मतभिन्नता दिसून येत आहे. त्याबद्दल दोन्हीही नेत्यांनी परस्परविरोधी विधाने केल्यामुळे गेले काही दिवस दोघे चर्चेत आहेत. राजू शेट्टी यांनी भाजपच्या कोणत्याही जाहीर सभांना हजेरी लावलेली नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ते भाजपच्या नेत्यांपासून दूर दिसत आहेत, तर दुसरीकडे मंत्री खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून भाजपच्या सभांना हजेरी लावत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गुरुवारच्या सभेसाठी दोघांनाही निमंत्रण देण्यात आले होते, मात्र शेट्टी उपस्थित राहिले नाहीत. खोत यांनी मात्र यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे फडणवीस यांच्या सभेला हजेरी लावली.मुख्यमंत्री येण्यापूर्वीच पंधरा मिनिटे अगोदर खोत यांचे सभास्थानी आगमन झाले. नेहमीचाच पोषाख असला तरी, त्यांनी भगव्या रंगाचा कुर्ता घातल्यामुळे उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यानंतर बराच वेळ ते शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्याशी चर्चा करीत होते. मुख्यमंत्री आल्यानंतर ते त्यांच्याशी चर्चा करू लागले. मुख्यमंत्रीही वारंवार त्यांचा हात हातात घेऊन दिलासा दिल्यासारखे करीत होते. नेत्यांच्या भाषणांपेक्षा उपस्थितांचे लक्ष याच गोष्टीकडे लागले होते.सभेनंतर पत्रकारांनी खोत यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी नकार दर्शविला.दोन्ही दादा हसले...व्यासपीठावरील सर्व नेत्यांना मफलरचे वाटप करण्यात येत होते. त्यावेळी फडणवीस आणि खोत यांच्याशिवाय सर्वांना मफलर देण्यात आला. या दोघांना मफलर द्यायचा का, अशा प्रश्नांकित चेहऱ्याने संबंधित कार्यकर्त्याने चंद्रकांतदादा पाटील आणि आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडे पाहिले. त्यांनी मफलर देण्यासाठी खुणावले. कार्यकर्त्याने फडणवीस व खोत यांच्या गळ्यात मफलर घातला. त्यावेळी दोन्ही दादांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांचे हास्य पाहून अन्य कार्यकर्त्यांचे लक्षही मफलर घातलेल्या सदाभाऊंकडे गेले. शेवटी ही गोष्ट सदाभाऊंच्या लक्षात आली आणि त्यांनी लक्षवेधी ठरलेला मफलर गळ्यातून बाजूला केला.