नवी दिल्ली- पाण्यापासून तयार केलेला बर्फ अनेकदा खाद्यपदार्थात वापरला जातो. तो शरीरासाठी घातक असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर खाण्यास योग्य नसलेला बर्फ ओळखता यावा, यासाठी बर्फात निळसर रंग टाकण्याबाबतचे निर्देश अन्न व औषध प्रशासनानं दिले आहेत. गेल्या अनेक काळापासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंजुरी दिली असून, त्याची प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
खाण्यात वापरण्यात येणारा बर्फ शरीरासाठी अपायकारक असल्यानं आरोग्याला धोका संभवू शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन अयोग्य बर्फ ओळखण्यासाठीच बर्फात निळसर रंग टाकावा, असे आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्तांना दिल्याची माहिती बापट यांनी या निवेदनाद्वारे दिली. बर्फाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये तसेच उद्योगासाठीही केला जातो. मात्र औद्योगिक कारणास्तव वापरण्यात येणारा, पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्यापासून तयार केलेला बर्फ अनेकदा खाद्यपदार्थातही वापरला जात असल्याचंही अनेकदा समोर आलं आहे.