लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेल्या मॅन-दौंस चक्रीवादळाने तामिळनाडूला तडाखा दिल्यानंतर आता ते विरले आहे. मात्र, आता पुन्हा दुसरीकडे बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमानजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होणार असून, हवामानात होत असलेल्या सातत्यपूर्ण बदलामुळे विदर्भ वगळून मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईसह लगतच्या परिसरांना प्रदूषणाने तडाखा दिला असतानाच दुसरीकडे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चकीवादळाचा प्रभाव म्हणून वाऱ्याचा दिशा आणि गती यामध्ये फरक पडला आहे. त्यामुळे अरबी समुद्र, केरळ आणि कर्नाटक किनारी वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ५५ किमी राहील. समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे. दरम्यान, हवामानात होत असलेल्या बदलामुळे किमान तापमानात फार काही बदल होणार नाहीत, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
१३ डिसेंबरला बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमानजवळ पुन्हा चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होईल. पुन्हा तीच प्रक्रिया सुरू होऊ शकते, तर विदर्भ वगळता मुंबईसह कोकणातील चार व मध्य महाराष्ट्रातील १० (खान्देश, नाशिक ते सांगली सोलापूरपर्यंत) अशा १४ जिल्ह्यांत आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.- माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ
काय होणार ?चक्रीवादळ विरले असून, केरळ-कर्नाटक सीमेवरील किनारपट्टीवर १३ डिसेंबरला पुन्हा अरबी समुद्रात ते उतरेल. आणि त्याचे कमी दाब क्षेत्रात रूपांतरण होईल. ते पश्चिकडे निघून जाईल.