पुणे : महागाई अजून कमी झालेली नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांच्या कामाचे रिझल्ट येण्यास वेळ लागेल. मोदींना अजून 5 वर्षे मिळाली तर ते बदल दिसून येऊ शकतील असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले.
एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवले पुण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रामदास आठवले म्हणाले, ‘‘पेट्रोलवर मोठयाप्रमाणात लागलेले कर कमी होणे आवश्यक आहे. महागाई कमी करण्यासाठी जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ. मुंबईमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये २२ लोकांचा झालेला मृत्यू ही गंभीर गोष्ट आहे. याप्रकररणाची न्यायालयीन चौकशी करून जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी. बुलेट ट्रेन नको अशी मागणी होत आहे, ती चुकीची आहे. उद्या विमान नको अशी मागणी होईल. नोटबंदीचा निर्णय चांगल्या हेतूने घेतला गेला होता. सोशल मिडीयावर सरकार विरोधी मत व्यक्त करणाºया पत्रकार व इतरांना नोटीसा देणे योग्य नाही.’’
सफाई कर्मचा-यांना जास्तीत जास्त वेतन मिळावे, त्यांना कंत्राटी पध्दतीने काम करावे लागू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. देशात १३ हजार सफाई मजदुर हाताने मैला उचलत असल्याचे एका सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे, ही प्रथा बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेले जात आहेत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाकडून गेल्या १७ दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता सेवा अभियानाचा समारोप २ आॅक्टोबर रोजी होणार आहे. स्वच्छतेसाठी केंद्राकडून मोठयाप्रमाणात प्रयत्न करण्यात आहेत, शासनाबरोबरच जनतेनेही यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते.