राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या येण्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना खुले पत्र लिहून नवाब मलिक निर्दोष ठरले तर त्यांचे स्वागत करा, पण देशद्रोहाचे आरोप असताना युतीत घेऊ नका अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ते पत्र जाहीर केले नसते तर चांगले झाले असते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीची भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली आहे. यामध्ये मिठाचा खडा पडण्याचे काही कारण नाहीय. भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांची भूमिका मांडली आहे, असे वळसे पाटील म्हणाले.
शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. फडणवीसांनी पत्र पाठवले ते बरोबर आहे. पण ते जाहीर नसत झाले तर ते चांगले होते, पण तो त्यांचा निर्णय आहे, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले, ते मी वाचले. नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यावरच मी माझे मत मांडणार आहे. मलिक यांनी अजूनही स्वतःच मत दिलेली नाही, असे पवार म्हणाले.
तर मिटकरी यांनी नवाब मलिक हे पक्षाचे नेते आहेत ते आता पक्षासोबत आहेत, असे स्पष्ट केले. महायुतीचा धर्म तिन्ही पक्षांनी पाळला पाहिजे. भाजपने काय करावे हा भाजपचा प्रश्न आहे. पण नवाब मलिक हे संकटात पक्षासोबत उभे राहिले आहेत, असेही मिटकरांनी सुनावले आहे.