मुंबई : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी अखेर प्रशासनाने २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण महासंचालनालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल ८ दिवसांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येणार आहेत.याआधी आयटीआय प्रवेश प्रक्रिया ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली होती. मात्र तेव्हा दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला नव्हता. त्यामुळे फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. याची दखल घेत, गुरुवारपासून प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात करण्यात आली. याआधी १२ सप्टेंबरला महासंचालनालयाने मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे १३ दिवसांपैकी राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ ४ दिवसांत प्रवेश अर्ज करावे लागणार आहेत. तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश उशीराने सुरू झाल्याचे व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सांगितले. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण शासकीय व अनुदानित आयटीआयमधील ७ हजार ७५२, खासगी आयटीआयमधील एकूण १८ हजार ८४२ जागा रिक्त असून लाखो विद्यार्थी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. (प्रतिनिधी)
आयटीआय प्रवेशाला रविवारपर्यंत मुदतवाढ
By admin | Published: September 23, 2016 4:39 AM