अकोला : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू झाली असून, यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रात दहावी नापास विद्यार्थ्यांनादेखील आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार आहे.यंदा नवीन शैक्षणिक सत्रासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्हतेत बदल करण्यात आल्याने दहावी नापास विद्यार्थ्यांनादेखील आयटीआयमध्ये प्रवेश मिळेल. या अभ्यासक्रमासाठी मागील वर्षीपर्यंत इयत्ता आठवी उत्तीर्ण आवश्यक होते, परंतु शासनाच्या नवीन निर्णयानुसार आठवी उत्तीर्ण प्रवेशाची अट काढण्यात आली असून, आता दहावी नापास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. शासनाच्या नवीन निर्णयामुळे आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यंदापासून या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही. तेव्हा या विद्यार्थ्यांना आता दहावी पास किंवा नापास होणे बंधनकारक झाले आहे. प्रवेश प्रक्रिया नव्या सत्रासाठी आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमाच्या ८३८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. २७ जून रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, हीच मेरिट लिस्ट असेल. ४ जुलै रोजी अंतिम यादी जाहीर होणार असून, प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला प्रारंभ होणार आहे. यंदा दहावी नापास विद्यार्थ्यांनाही आयटीआय प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच प्रवेश प्रक्रियेची आॅनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.- अनिल भुते, प्रबंधक, आयटीआय, अकोला
दहावी नापास विद्यार्थ्यांनाही आता ‘आयटीआय’ प्रवेश
By admin | Published: June 16, 2015 2:58 AM