अजय पाटील,
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने ५ उमेदवार उभे केले होते व सर्व उमेदवार विजयी करून आणले. ही निवडणूक जिंकल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवनाच्या प्रागंणातच विजयी आनंदोत्सव साजरा करत होते. सर्वच नेते आनंदोत्सव व घोषणाबाजी करत असताना, तत्कालीन विधानसभेचे विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयोत्सव साजरा करत असलेल्या नेत्यांमधून मार्ग काढत भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांना मिठी मारली, महाजनांनीही त्यांना मिठी मारली. फडणविसांनी महाजनांच्या कानात काही सांगितले व महाजन लगेच चिंतातूर चेहरा करत निघून गेले. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या, त्या सर्वच महाराष्ट्राने पाहिल्या आहेत.
त्यामुळे फडणविसांनी २० रोजीच्या भाजपच्या विजयोत्सवात महाजनांच्या कानात नेमके काय सांगितले ? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. याबाबत ‘लोकमत’ सोबत बोलत असताना गिरीश महाजन यांनी अखेर कानात सांगितलेल्या या गोष्टींचा खुलासा केला आहे. फडणविसांनी मिठी मारल्यानंतर कानाजवळ येवून, ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’ , एवढं सांगितले. फडणविसांचे एवढे शब्द ऐकून त्या विजयोत्सवातून थेट फडणविस यांचा ‘सागर’ या निवासस्थानी पोहचलो व त्यानंतरच हे ‘ऑपरेशन’ मार्गी लावले असल्याची माहिती महाजनांनी सांगितली. त्याठिकाणाहूनच शिंदेसोबत असलेल्या आमदारांना सुरतला पाठविण्याचे नियोजन करून, हे ऑपरेशन सुरु केले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर व एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर हे ऑपरेशन अखेर फत्ते झाले असल्याचेही महाजनांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
दीड वर्षांपुर्वींच सुरु झाले होते मिशनएकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदारांचेच कामे होत नसल्याने नाराज होते, दिवसेंदिवस ही नाराजी वाढत गेली होती. याबाबत केवळ काही दिवसातच ही नाराजी उफाळून आली नाही. हे सर्व काही दिड वर्षांपुर्वीच ठरलं असल्याचेही महाजनांनी सांगितले. तसेच याबाबत दिल्ली स्तरावर काही बैठका देखील पार पडल्या असल्याचेही महाजनांनी सांगितले. मात्र, शिवसेनेचे आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतरच बंड करतील याबाबत आपल्याला फार काही कल्पना नसल्याचे महाजनांनी सांगितले.
मंत्रीपदाबाबत मात्र मौनपक्षासाठी काम करत असून, पक्षाच्या हितासाठी जी काही जबाबदारी सोपविण्यात आली ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे महाजनांनी सांगितले. नव्या शिंदे सरकारात महाजनांना कोणते मंत्रीपद ? याबाबत विचारले असता महाजनांनी याबाबत मौन पाळले. तसेच पालकमंत्रीपदाबाबत देखील कोणताही खुलासा केला नाही. मात्र, आगामी येत्या तीन महिन्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुका, तसेच याआधी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महाजनांनी सांभाळले असल्याने महाजनांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.