मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती होणार की नाही याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं असताना गुरुवारी रात्री उशिरा भाजपा-शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात ही बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 162 जागा तर उर्वरित 126 जागा शिवसेना लढवणार असल्याचं निश्चित झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावर सहमत न झाल्याने दोन्ही पक्षाची 25 वर्षाची युती तुटली होती.
शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपा 162 मधील जागा देणार आहे. मात्र या मित्रपक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे. जागावाटपाबाबत आणि युतीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.
यापूर्वी शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर जोर देत होती. शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले होते की, भाजपाने 50-50 जागावाटपाचं सन्मान करायला हवा. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा फॉर्म्युला ठरला होता. त्यामुळे भाजपाने त्याचा सन्मान करणं गरजेचे आहे.
गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा काही जागा जादा यावेळी जिंकणे आवश्यक आहे. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाला गेल्यावेळच्या यशाचीही पुनरावृत्ती करता आली नाही असे चित्र निकालात समोर आले तर ते पक्षाची मानहानी करणारे असेल. कोणताही पक्ष लोकप्रियतेच्या कितीही शिखरावर असला तरी त्याच्या यशाचे प्रमाण हे ८० टक्के इतके असते याकडे भाजपने शिवसेनेचे लक्ष वेधले असून त्यामुळेच किमान १२२ जागा जिंकायच्या तर १५० जागा लढाव्या लागतील असा तर्क दिला होता.मात्र वरिष्ठांच्या आदेशामुळे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपाने शिवसेनेला काही जागा वाढवून देण्यासाठी सहमती दिली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून 22 सप्टेंबर रोजी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शिवसेना-भाजपा यांची युती अधिकृतरित्या जाहीर होऊ शकते असं बोललं जात आहे.