गिरीश गांधी, (विश्वस्त वनराई व नितीन गडकरी यांचे शिक्षक) गडकरींना आठव्या, नवव्या वर्गात मी अर्थशास्त्र व मराठी हे दोन विषय शिकविले. त्या वेळी शाळेमध्ये विविध शालेय उपक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहत होता, त्यात नितीन सक्रिय राहायचे. त्या काळातील दोन घटना मला मुख्यत्वे करून आठवतात. माझ्यासोबतच चित्रकलेचे शिक्षक असलेले स्व. बाळ चोरघडे यांनी व मी मुख्याध्यापकांच्या सूचनेवरून मोठे चित्रकला प्रदर्शन आयोजित केले होते. रात्री उशिरापर्यंत याची तयारी करावी लागत होती. या उपक्रमात नियमितपणे उपस्थित राहाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नितीन एक असायचा. दुसरे उदाहरण मला आठवते. या शाळेचे क्रीडांगण रेशीमबागवर आहे, परंतु हे क्रीडांगण दुर्लक्षित होते. मला नेहमी या गोष्टीची खंत वाटायची. मी मुख्याध्यापकांच्या परवानगीने त्या ठिकाणी दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून मैदान स्वच्छ करण्याचे ठरविले. त्या श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चमूतदेखील गडकरी हे नियमितपणे येणारे होते. त्यांच्यासोबत फडणवीस, चवरे, मंडेकर ही मुले नेहमी असायची. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हास्य मला आजही आठवते. ते निरागस हास्य आज एवढी वर्षे राजकारणात राहूनही कायम आहे, याचा मला आनंद आहे. आईचे संस्कार, संघाची शिकवण ही त्याच्या जमेची बाजू आहे. जी जबाबदारी नितीनवर सोपविण्यात आली, ती त्याने अतिशय सक्षमपणे पार पाडली व त्या संधीचे सोने केले. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून त्याने केलेली सुरुवात, भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वापर्यंतची त्याची मजल ही देदीप्यमान आहे. निवडणुकीचे राजकारण सोडून, इतर वेळी पक्षभेद न करता, सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम व विकासाचे लक्ष्य ही त्याची फार मोठी जमेची बाजू आहे. राजकारणामधील संवाद लोकशाहीला अतिशय आवश्यक आहे. त्याला मी माझ्या वतीने अनंत शुभेच्छा देतो.
त्याची मजल देदीप्यमान..!
By admin | Published: May 27, 2017 6:11 AM