भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दीक चकमक दिसून आली. भाजप सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही. दरम्यान, भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी मात्र कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं. तसंच भोंग्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी धर्मा धर्मांमध्ये दरी निर्माण होते हे निराशाजनक असल्याचं म्हटलं.
“राज्य सरकारच्या कामाविषयी सांगायचं तर मी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मनापासून कौतुक करते. त्यांनी अतिशय उत्तमरित्या तो प्रकार हाताळला आहे. राजकीय मंचावर येऊन आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. पण आरोग्य हा असा विषय आहे, की कोरोनाशी सामना करताना केंद्र सरकार सतर्क होतं आणि लोकांची काळजी घेण्याचं काम करत होतं. महाराष्ट्र देशातील मोठं राज्य आहे आणि लोकसंख्याही जास्त आहे, बाहेरून येणाऱ्या कामगारांची संख्याही अधिक आहे. याकडे लक्ष देताना टोपे यांच्या माध्यमातून काम चांगल्या प्रकारे झालं आहे,” असं म्हणत मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
... ते अस्वस्थ करणारं“धर्माधर्मांमध्ये दरी निर्माण होते हे निश्चितच निराशाजनक आहे. यात कोणाविषयी बोलण्याचं कारण नाही. ज्या गोष्टी गुण्यागोविंदानं आधी समाजात नांदत होत्या, त्यात अचानक आलेली ही विषयमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधीनाकधी राजकीय लोकांना याला सामोरं जावं लागेल,” असंही त्यांनी भोंग्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.