मेघेंचा भाजप प्रवेश: राजकीय समीकरणांना कलाटणीनागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दत्ता मेघे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांना कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.दत्ता मेघे, त्यांचे पुत्र सागर आणि समीर यांच्या राजकीय शक्तीचे केंद्रबिंदू नागपूरच राहिले आहे. मेघे नागपूरचे खासदार होते. सागर मेघे यांना भाजपने सर्वप्रथम नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातूनच विधान परिषदेत पाठविले होते. समीर मेघे यांची युवक काँग्रेसमधील वाटचालही येथेच झाली. त्यामुळे मेघे कुटुंबाचा शहरातील राजकारणावर कमी-अधिक प्रमाणात आजही प्रभाव आहे. या संपूर्ण बाबींचा विचार केला तर, येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे, असे राजकीय जाणकार मानतात.आयुष्याच्या संध्याकाळी मेघे यांनी केलेला पक्ष बदल हा त्यांच्या पुत्रांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आहे, ही बाब आता लपून राहिली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत दोनपैकी एका पुत्राला तरी शहरातील एका विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन मतदार संघ कोणते व तेथील भाजपच्या विद्यमान इच्छुकांवर काय परिणाम होईल, याबाबत आजच चर्चा सुरू झाली आहे.पश्चिम नागपूरमधून सागर किंवा समीर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वतरुळात आहे. पश्चिममध्ये भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर देशमुख इच्छुक आहेत. मेघे पुत्राला उमेदवारी मिळाली तर ते कदाचित रिंगणात उतरणार नाही. पण याच मतदार संघातून मेघे कुटुंबीयांचे निकटवर्तीय व विद्यमान राज्यमंत्री राजेंद्र मुळक इच्छुक आहेत. त्यांनी तयारीही सुरू केली आहे.
घडलंय, बिघडलंय !
By admin | Published: June 10, 2014 1:18 AM