नाशिक: राज्यात सत्तांतर होऊ शकतं हा विश्वास सुरुवातीला फक्त दोनच व्यक्तींना होता. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येऊ शकतं, हे मला आणि शरद पवारांनाच माहीत होतं. शरद पवारांना ईडीची नोटीस आली. त्यावेळी मी त्यांना भेटायलादेखील गेलो होतो. तेव्हापासून आमच्यात चर्चा सुरू होती, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात घडलेल्या सत्तांतरामागील घटनांचा पट उलगडला. वरिष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी नाशिकमध्ये संजय राऊत यांची मुलाखत घेतली. त्यात संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर 'रोखठोक' भाष्य केलं.भाजपाला सत्तेतून खाली खेचता येऊ शकतं हा विश्वास मला आणि शरद पवारांना होता. शरद पवार सुरुवातीला आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश असल्याचं सांगत होते. पण ती शरद पवारांच्या कामाची पद्धत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. २०१४ मध्ये आम्हीदेखील विरोधी पक्षात होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. २०१४ मध्ये भाजपानं सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी आम्ही विरोधी बाकांवर होतो. विरोधी पक्षनेतादेखील आमच्याच पक्षाचा होता, याची राऊत यांनी आठवण करुन दिली. राज्यात शिवसेनेचं सरकार येऊ शकतं, हा विचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यावर पहिल्यांदा मनात आला, असं राऊत यांनी सांगितलं. 'शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यावर मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी निवडणुकांची घोषणादेखील झाली होती. पवारांना भेटणं हा त्यावेळी गुन्हा होता. त्यांच्या बाजूनं बोलणारेदेखील कमी होते. त्या परिस्थितीत मी पवारांची भेट घेतली,' अशा शब्दांमध्ये राऊत यांनी सत्तास्थापनेच्या घडामोडी उपस्थितांना सांगितल्या.देशासाठी मोठं योगदान असणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्यावर कारवाई होणं चुकीचं असल्याचं त्यावेळी मी शरद पवारांना म्हटलं होतं. आज तुमच्यासारख्या दिग्गज नेत्यावर सूडबुद्धीनं कारवाई होऊ शकते. तर मग इतरांचं काय, ही भावना त्यावेळी मी पवारांना बोलून दाखवली होती, असं राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी मुलाखतीत मोदी सरकारवर तोफ डागली. कोणीही अंगावर आलं, तरी माझं काहीही वाकडं करू शकत नाही. तुम्ही माझ्यामागे पोलीस, सीबीआय, ईडी लावू शकत नाही. कारण मी फाटका माणूस आहे, असं राऊत म्हणाले. आम्ही सगळ्यांना पुरुन उरतो. राज्यातलं सत्तांतर हे त्याचंच उदाहरण आहे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं.
'ती' शरद पवारांच्या कामाची पद्धत; संजय राऊत यांनी सांगितला पवारांचा भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 7:55 PM