ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २१ - अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ प्रमुख भुमिका साकारत असलेल्या 'जग्गा जासूस' चित्रपटाच्या एका सीनसाठी दोन टँकर पाणी वाया घालवण्यात आलं आहे. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना अशाप्रकारे पाणी वाया घालवल्याने टीका होऊ लागली आहे. चित्रपटात पावसाच्या सीनसाठी पाण्याचे हे दोन टँकर मागवण्यात आले होते. शुटिंगसाठी बलार्ड पिअरमध्ये चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता. यावेळी सीन शूट करताना पाऊस दाखवण्यासाठी दोन्ही टँकरमधील पाणी वापरण्यात आलं.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटासाठी पावसाचा सीन शूट करण्यात येणार होता. यासाठी 12 तास शुटींग चालू होतं. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पाण्याचे दोन टँकर मागवण्यात आले होते. यातील एक टँकरमधील पाणीतर अक्षरक्ष रस्त्यावर ओतून देण्यात आलं जेणेकरुन पाण्याची डबकी साचल्याचं दृश्य निर्माण करण्यात यावं. एकीकडे लातूर, जळगाव, नांदेड, औरंगाबादसोबत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दुष्काळ पडला असताना अशाप्रकारे पाणी वाया घालवल्याने अनेकजण निषेध व्यक्त करत आहेत. चित्रपटसृष्टीमधील काही कलाकारांनीदेखील पाण्याचा अशाप्रकारे गैरवापर करण्यावर विरोध व्यक्त केला आहे.