मुंबई : उद्धवसेनेची निवडणूक निशाणी असलेल्या मशाल चिन्हावर नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या ‘मशाल गीता’वर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून, यातील ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ हे दोन शब्द वगळा, अशी नोटीस उद्धवसेनेला पाठवली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ‘हिंदू’ या शब्दावर आम्ही मते मागितलेली नाहीत, त्याचप्रमाणे देवी भवानी हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून, महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे हे शब्द वगळणार नाही, प्रसंगी कोर्टात जाऊ, अशी भूमिका घेतली.
ठाकरे म्हणाले, ‘मशाल गीत’ हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणागीत आहे. यातील ‘हिंदू’ हा शब्द आयोगाला खटकला आहे. मात्र, आम्ही धर्माच्या आधारावर मते मागितलेली नाहीत. याआधी धर्माच्या आधारावर गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली होती. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ठाकरेंनी यावेळी त्या भाषणांचा व्हिडीओ दाखवला.
‘उद्या जय शिवाजी हा शब्दही काढायला सांगतील...’धर्माच्या नावाखाली प्रचार केल्याप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने सहा वर्षांसाठी मतदान करण्यास व निवडणूक लढविण्यावर बंदी घातली होती, असे ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, या गीतामध्ये कोरसकडून ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली जात आहे. त्यातील ‘जय भवानी’ हा शब्दच काढून टाकण्यास सांगण्यात आला आहे. उद्या ‘जय शिवाजी’ हा शब्दही काढायला सांगतील. कोणत्याही परिस्थितीत हा शब्द काढणार नाही. वेळ आली तर न्यायालयातही जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
६० सेकंदांचे मशाल गीत ‘शंखनाद होऊ दे, रणदुदंभी वाजू दे’ हे मशाल गीत ६० सेकंदांचे आहे. गीतात ‘हिंदू तुझा धर्म, जाणून घे मर्म, जीव त्यास कर तू बहाल’ कडवे आहे, तर कोरसमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ शब्द आहेत. यातील हिंदू व जय भवानी हे शब्द निवडणूक आयोगाला खटकले.