डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन : चवदार तळे सत्याग्रहाचा ८९ वा वर्धापन दिन महाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर मानवी मूल्यांसाठी सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक घटनेचा ८९ वा वर्धापन दिन रविवारी महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भीमसैनिकांच्या ‘जय भीम’च्या जयघोषांनी संपूर्ण महाड दुमदुमून गेले होते. गेल्या दोन दिवसांपासून चवदार तळे व क्रांतीभूमी परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.रविवारी सकाळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, आ. भरत गोगावले, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. अॅड. प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अॅड. आनंदराज आंबेडकर, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रशांत ठाकूर, मनोज संसारे, रिपब्लिकन एकताचे नेते गंगाराम इंदिसे आदी नेत्यांनी यावेळी अभिवादन केले. सकाळी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून प्रभातफेरी काढून संचलन केले. तर डॉ. आंबेडकर सभागृहात ११ मार्चपासून बुद्धिस्ट सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या श्रामणेर शिबिराचा समारोप माईसाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चवदार तळे मुख्य रस्ता, डॉ. आंबेडकर चौक, दस्तुरी नाका, क्रांतीस्तूप परिसराच्या मार्गावर दुतर्फा डॉ. आंबेडकर यांची पोस्टर्स, छायाचित्रे, फोटोफ्रेम, जीवनग्रंथ सीडी आदींच्या विक्रीसाठी दुकाने थाटण्यात आली होती. (वार्ताहर)
‘जय भीम’चा महाडमध्ये जयघोष
By admin | Published: March 21, 2016 1:40 AM