लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून वाजवले किंवा गायले जावे असा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा याबरोबरच आता राज्यगीत गाणे किंवा वाजविणे अनिवार्य झाले आहे.
कवी राजा बढे यांनी लिहिलेले आणि शाहीर साबळे यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला १ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले होते. आता हे गीत सर्वच शाळांमध्ये वाजवणे किंवा गाणे याबद्दलचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
स्फूर्तिदायक गीतजय जय महाराष्ट्र माझा हे गीत स्फूर्तिदायक आणि आवेशपूर्ण आहे. राज्याची थोर परंपरांची गाथा या गीतातून मांडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील थोरांची, त्यांच्या कार्याची माहिती होईल. शाळेचे दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र गीत वाजवावे किंवा गावे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.