- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बस वर यापुढे‘जय महाराष्ट्र’ लिहिले जाईल, असे स्पष्ट करीत परिहवन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्नाटकमध्ये ‘जय महाराष्ट्र’ बोलण्यास बंदी घालण्याच्या फतव्याला शनिवारी पुण्यात उत्तर दिले. एसटीच्या विभागीय कार्यालयावर उभारण्यात आलेल्या सौरउर्जा प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी रावते पत्रकारांशी बोलत होते. रावते म्हणाले, की पुढील चार महिन्यात एसटीच्या ताफ्यात सुसज्य १२०० नव्या शिवशाही बस येणार आहेत. तसेच भांडवली खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार स्टील बांधणीच्या बस तयार केल्या जाणार आहेत. एक बस तयार करून प्रायोगिक तत्वावर चालविली जात आहे. बसचा सांगाडा कायम ठेवून केवळ बाह्यरुप स्टीलचे केले आहे. यामुळे एसटीचे स्वरूप पालटून जाणार आहे.दरम्यान, सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ७ लाख ६५ हजार रुपये खर्च आला असून प्रकल्पातून, दररोज जवळपास ३० ते ४० युनिट वीज महामंडळास मिळणार आहे. या प्रकल्पामुळे एसटीचे वर्षाला सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांची बचत होणार आहे. महावितरणही जादाची वीज घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पालखी सोहळ्यासाठी जादा जागा- पालखी सोहळ्यानिमित्त एसटी बसेसचे नियोजन करण्यासाठी भोसरी येथील वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेमध्ये दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गरजेनुसार अधिकच्या बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.- मराठवाडा, विदर्भ, पश्चिम माहराष्ट्रासह खान्देशातील वारकरी, भाविकांसाठी गाड्या सोडल्या जातील. तसेच पंढरपुर शहरात मंदिरापर्यंत जाण्यासाठी मागील वर्षीप्रमाणेच १० रुपये भाडे आकारले जाईल. या बसफेऱ्या वाढविल्या जातील, असे रावते यांनी सांगितले.