नाशिक - 'लोकमत'नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांचा 'विकिपीडिया'या जागतिक माहिती स्रोत संकेतस्थळाकडून मुंबई येथील लोकमत मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला.
'विकिपीडिया'च्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खरोटे यांनी टिपलेल्या जेजुरीमधील चंपाषष्ठीच्या ‘खंडोबा उत्सव’ या छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकाविला होता. या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये जगभरातून सुमारे दोन लाख ४६ हजार १०१ छायाचित्रे प्राप्त झाली होती. या सर्व छायाचित्रांमध्ये भारताच्या टॉप टेनमधील अव्वलस्थानी राहिलेले 'खंडोबा उत्सव' छायाचित्राने बाजी मारली आणि प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे 2012 सालानंतर आंतरराष्ट्रीय ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स' स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला. आंतरराष्ट्रीय पातळीवर विकिपीडियाच्या स्पर्धेत भारतीय छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळण्याची ही पहिली वेळ ठरली, असे विकिपीडियाचे भारतीय चॅपटर कौंसिल सदस्य सुयश द्विवेदी यांनी सांगितले. वरळी येथील लोकमत कार्यालयात त्यांच्या हस्ते प्रशांत खरोटे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस - कॅनन 5डी-मार्क-4 कॅमेरा आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 'लोकमत'च्या संपादकीय आणि व्यवस्थापकीय विभागातील वरिष्ठही या पुरस्कार वितरणाला उपस्थित होते.