सोलापूर: केंद्रातील मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. मोदी सरकारच्या योजना, काम, धोरणे, कार्यक्रम देशवासीयांपर्यंत या माध्यमातून पोहोचवला जात आहे. मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कामगिरीवर विरोधकांनी सडकून टीका केलेली असली तरी, भाजपचे नेते मात्र पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारच्या सुशासनाचे गोडवे गाताना दिसत आहेत. अशातच एका भाजप खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक करत, मोदी सरकारच्या कमाल कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावल्याचे म्हटले आहे.
मोदी सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना दिलासा मिळाला आणि जगात भारताची मान उंचावल्याचा दावा सोलापूरचे भाजपाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कारभाराचा आढावा सादर करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा भाजपने आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी मोदी सरकारच्या कामांची प्रशंसा केली.
गोरगरीब आणि वंचितांना आधार मिळाला
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत स्वयंपाक गॅस जोडणी, कोटीपेक्षा अधिक लोकांना मालकीची घरे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती यांसारख्या योजनांतून मोदी सरकारने लोककल्याण कार्यक्रम प्रभावीपणे आखले आहेत. त्यामुळे गोरगरीब आणि वंचितांना आधार मिळाला आहे. जनमानसात पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता कायम असून यापुढेही कायम राहणार असल्याचे जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले.
जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढली
सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली असून जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढल्याचे स्वामी यांनी नमूद केले.