औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणात गेल्या चार वर्षांत तब्बल ८६ दशलक्ष लिटर विषारी रसायन सोडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मुंबई, गुजरात, ठाण्यातील पाठीराख्यांच्या मदतीने आगा खान, सुमित खांबेकर यांनी विविध कंपन्यांमधील विषारी रसायनाची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट घेतले. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील घातक रसायनांचे ७ टँकर खाम नदीत सोडणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. त्यात दोघांनाही अटक झाली. २००९ पासून हा बेकायदेशीर प्रकार सुरू असून, चार वर्षांपासून जायकवाडीत स्टरलाईटसह ५०० हून अधिक कंपन्यांतील विषारी रसायन सोडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दररोज ६ टँकर रसायनांची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीने कंत्राट दिले होते. १० हजार लिटरचे प्रत्येक टँकर आहे. रोज ६० हजार लिटर रसायन खाम नदी पात्रात सोडण्यात आले. महिन्याला १८ लाख लिटर म्हणजेच वर्षाला २ कोटी १६ लाख तर ४ वर्षांत ८ कोटी ६४ लाख लिटर रसायन जायकवाडीच्या दिशेने गेले. १० लाख लिटरचे १ एमएलडी प्रमाणे चार वर्षांत ८६ एमएलडी रसायन पाण्यात मिसळले गेले.
जायकवाडीत ८६ दशलक्ष लिटर रसायने सोडली
By admin | Published: March 05, 2015 1:24 AM