मुंबई : जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पास विरोध दर्शवत माडबन, जैतापूर, मिठगावाणे पंचक्रोशी संघर्ष समितीने प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. सरकारने २ आॅगस्टपर्यंत आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, तर सरकारविरोधात जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघधरे यांनी दिला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेबोलत होते.
वाघधरे म्हणाले की, २६ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकल्पाची पर्यावरणीय मुदत संपलेली आहे. तरीही सरकार परस्पर या प्रकल्पाला मुदतवाढ देत आहे. कायद्यानुसार प्रकल्पाचा अहवाल पुन्हा तयार करून जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. मात्र सरकार कायदा पायदळी तुवडत प्रकल्प राबवत आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून कळवले आहे.मात्र त्याचेही उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना तत्कालीन आमदार आणि आताचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रकल्पाला विरोध केला होता. याठिकाणच्या स्थानिकांच्या जमिनी कंपनीने बेकायदेशीरपणे बळकावल्याचे त्यांनी चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. शिवाय प्रकल्प कशाप्रकारे कोकणासाठी धोकादायक आहे, याची अनेक कारणे मुनगंटीवार यांनीसांगितली होती. मात्र सत्तेवर आल्यानंतर मुनगंटीवार यांनी चुप्पी साधल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.