मुंबई : हुंड्यासाठी छळ करून सुनेला लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत जाळून घेऊन आत्महत्या करण्यास भाग पाडणारी सासू जराही दया दाखविण्यास पात्र नाही, असे ठाममणे सांगत सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी तालुक्यातील एका महिलेची वयाच्या ७५व्या वर्षी तुरुंगात रवानगी केली.जवाहरनगर, कबनूर येथील ताराबाई गंगाधर तरळकर हिचे अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने असेही नमूद केले की, सुनेने जाळून घेऊन आत्महत्या करण्यास ताराबाई हिच सर्वस्वी जबाबदार आहे, हे सप्रमाण सिद्ध झाल्याने, वयाचा विचार करून तिला दया दाखविण्याचे काहीच कारण नाही. उलट गुन्हा एवढा गंभीर असूनही फक्त सात वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा झाली याबद्दल ताराबाईने स्वत:ला नशिबवान मानायला हवे!वयाच्या अवघ्या विशीत असलेल्या सूनेने सासूच्या छळाला कंटाळून लग्नानंतर केवळ आठच महिन्यांत स्वत:ला जाळून घ्यावे ही मन विषण्ण करणारी घटना आहे. अशा प्रवृत्तींचा कठोरपणे बीमोड व्हायलाच हवा, असेही न्यायालयाने ठामपणे म्हटले. भगवान आणि मालू ढवळे यांची कन्या असलेल्या कृष्णाबाईचे कबनूर येथील हणमंत तरळकर याच्याशी १२ मे १९८९ रोजी लग्न झाले. तिच्या सासरी पतीखेरीज सासू ताराबाई, सासरे गंगाधर आणि १८ वर्षांची नणंद बाळाबाई असे लोक होते. लग्न होऊन आल्यापासून ताराबाईने, लग्नात माहेरहून सोनेनाणे, कपडे, पैसे वगैरे काहीही आणले नाही यावरून, कृष्णाबाईचा सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता.सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा कामयराहत्या घरात १०० टक्के भाजल्याने सून कृष्णाबाई हिचा मृत्यू झाला तेव्हा (२३ मार्च १९९०) ताराबाई सुमारे ५० वर्षांची होती. कोल्हापूर सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम केल्याने ताराबाईला आता शिक्षा भोगण्यासाठी वयाच्या ७५व्या वर्षी तुरुंगात जावे लागेल. सासऱ्याची साक्ष नाही : खरेतर त्या दिवशी घरात जे काही घडले ते कृष्णाबाईचे सासरे गंगाधर यांनी पाहिले होते. पण अभियोग पक्षाने किंवा आरोपी ताराबाईनेही त्यांना साक्षीदार म्हणून उभे केले नाही. ताराबाईचे बचावाचे अनेक मुद्दे फेटाळताना न्यायालयाने नेमके यावरच बोट ठेवले.
७५व्या वर्षी सासूला तुरुंगवास
By admin | Published: January 23, 2015 2:07 AM