ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 27 : जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मुंबई संघाने पटकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये मुंबईने पुण्याला ४ -२ ने मात दिली. स्पर्धेचा अंतिम सामना जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात गुरूवारी खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारीत वेळेत गोल करता आले नाही. मुंबई संघाला मध्यातंरानंतर लगेचच पेनल्टी मिळाली होती. मात्र त्याचा फायदा मुंबईला घेता आला नाही. पुण्याची गोलरक्षक निव्या काकडे हिने मुंबई संघाचे गोल करण्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर टायब्रेकरमध्ये मुंबईने पुण्यावर ४ -२ ने विजय मिळवला.
पारितोषिक वितरण दलुभाऊ जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, जैन इरिगेशनचे संचालक आणि फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे सचिव सॉर्टर वाझ, विफाचे लेखाधिकारी अंकुर शाह, जफर शेख, सामनाधिकारी राजेंद्र राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप, फुटबॉल संघटनेचे कार्याध्यक्ष मोहम्मद आबीद, सचिव फारुक शेख, सहसचिव प्रा.डॉ.अनिता कोल्हे, ताहेर शेख, शेखर देशमुख, विनय मुरगुड उपस्थित होते. प्रास्ताविक फारुक शेख यांनी केले. सुत्रसंचलन दीक्षा सोनवणे हिने केले तर आभार प्रा.डॉ. अनिता कोल्हे यांनी मानले. स्पर्धेसाठी राजेंद्र राऊत, योगेश हिरेमठ, गजानन मगुटकर(कोल्हापूर), आशिष लोखंडे, रमीझ शेख (अमरावती), बलराम मुराडी, अक्षय सहारे (यवतमाळ), अलोक यादव (मुंबई), सौरभ गोरे (नागपूर),नरेश शिंदे (धुळे) यांचे सहकार्य लाभले.