ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - प्रसिध्द जैन इरिगेशन समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांचे गुरुवारी दुपारी चार वाजून सात मिनिटांनी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरु होते.
भवरलाल जैन यांच्या निधनावर आम्ही हरलो, देव जिंकला अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन समूहाचे उपाध्यक्ष आणि भंवरलाल जैन यांचे ज्येष्ठ पुत्र अशोक जैन यांनी दिली. १९८० मध्ये भवरलाल जैन यांनी पीव्हीसी पाईप निर्मितीची कंपनी सुरु केली. नव्वदच्या दशकामध्ये भारतात त्यांनी सूक्ष्म जलसिंचनाची संकल्पना रुजवली. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
१९९७ साली त्यांना प्रतिष्ठेच्या क्रॉफोर्ड रीड मेमोरीयल या अमेरिकन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती होते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोड या छोटयाशा गावात एका शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर १९३७ रोजी त्यांचा जन्म झाला.
कायद्याचे पदवीधर असणा-या भवरलाल जैन यांनी १९६३ साली व्यवसायाला सुरुवात केली. व्यावसायिक असण्याबरोबर भवरलाल जैन लेखकही होते. त्यांनी मराठी, इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहीली.