बाहुबली : मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय जैन संघटना कार्य करीत आहे. त्याची व्याप्ती संपूर्ण देशभर आहे. आगामी काळात संघटना शेती शेतकरी व युवक युवतींच्या प्रगतीसाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष व कोल्हापूरचे प्रसिद्ध जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष व कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योगपती पारस ओसवाल यांनी केले. ते कुभोजगिरी येथे आयोजित भारतीय जैन संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशनाच्या सांगता समारंभात बोलत होते.ओसवाल यांनी आगामी वर्षभरामध्ये राज्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या विधायक कामांची कार्यपद्घती राज्यातील कार्यकर्त्यांसमोर मांडली. वेळेसोबत चालेल तो टिकेल अन्यथा तो मिटेल, त्यामुळे संघटनेच्या पदधिकाऱ्यांना त्यांनी प्रगतीसाठी नवनवीन कार्यप्रणाली अवलंबण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात संघटनेकडून ‘‘जेम्स फॉर इंडिया’’ असा नारा दिला. प्रत्येक व्यक्तिने भारतासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बीजेएस यावर्षी जैन व जैनेतर समाजासाठी विविध विधायक कार्ये घेऊन अत्यंत जोमाने कार्य करणार असल्याचे विविध राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संघटनेचे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प जैन समाजासाठी राबविण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. त्यामध्ये जैन समाजातील व्यापाऱ्यांसाठी व्यापारवृद्घी कार्यशाळा, मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधन, कौटुंबिक कलह निवारण्यासाठी विशेष प्रकल्प, युवक-युवतींना जोडीदार निवडण्याची पारंपरिक पद्धत बंद करून नवीन प्रथा सुरू करणे, मूल्यशिक्षणावर आधारित शिक्षणप्रणाली वाढविणे, अल्पसंख्याक कार्यशाळांचे आयोजन, आदी अनेक कार्यक्रमांचे बृहत नियोजन करण्यात आले आहे. सांगता समारंभाप्रसंगी अशोक संघवी सरेंदग जैन, हस्तिलाला बंब या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)भारतीय जैन संघटनेचा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठीचा मूल्य शिक्षणाचा शास्त्रशुद्ध प्रकल्प राज्य सरकारने स्वीकारला आहे. ३४ जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी आगामी काळात होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना मूल्यशिक्षणाचा प्रकल्प देशभरातील १४ लाख शाळांपर्यंत मोफत पोहचविण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. देशभरातील इयत्ता आठवी ते १२ वीच्या मुलांना आय.आय.एम., आय.आय.टी., आय.ए.एस., देहरादून जे.जे.आर्ट, होमीभाभा रिसर्च येथे ‘शैक्षणिक प्रबोधन सहल’ काढण्यात येणार आहे. राज्यातील विद्यापीठांशी करार करून महाविद्यालयीन युवतींचे प्रबोधन करण्याचे उद्दिष्ट.या अधिवेशनात भारतीय जैन संघटना (बीजेएस) आता संपूर्ण महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शैक्षणिक पुनर्वसनासाठी पुण्यात आणणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुथा यांनी महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत वाढत चाललेल्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. येत्या तीन-चार महिन्यांत २०१४ व २०१५ मध्ये आत्महत्या केलेल्या ४८०० ते ५००० शेतकऱ्यांच्या घरी जाऊन, सर्वेक्षण करून त्यांच्या मुला-मुलींना येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षणासाठी आणण्याचा निर्णय या अधिवेशनात सहमतीने घेतला.
जैन संघटना आगामी काळात शेतकरी, युवकांसाठी काम करणार
By admin | Published: January 11, 2016 1:13 AM