मुंबई : देशातील आर्थिक विकासात जैन धर्मीयांचे योगदान नेहमीच मोठे राहिलेले आहे. जैन बांधव हा दान देण्यात विश्वास ठेवतो आणि त्या विचारातूनच समाजासाठी अनेक उपक्रम राबवित असतो. सध्या मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जैन बांधवांनी तेथील गोवंश वाचविण्यासाठी उपक्रम सुरू करावेत. या उपक्रमातून गोसेवा होईल आणि शेतकऱ्यांना मदतही होईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय जैन महामंडलच्या वतीने दादर येथे आयोजित २६१५ व्या भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाप्रसंगी फडणवीस बोलत होते. या वेळी आमदार राज पुरोहित, महामंडलाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश धाकड, समाजसेवक सुभाष रुणवाल, बी. सी. जैन, बाबुलाल बाफना, महिला अध्यक्ष कुमुद कच्छरा, चंदा रुणवाल, आर. के. जैन, बाबूलाल जैन आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. समाजातील संघर्ष संपविण्यासाठी भगवान महावीर यांच्या शाश्वत विचारांचा मार्ग अवलंबविला पाहिजे. मानव कल्याणासाठी हे विचारच प्रेरक ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. भगवान महावीर यांनी पंचतत्त्वाच्या संवर्धनातून जीवन जगण्याची कला शिकविली असून, त्यांचा समावेश जीवनात करण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील अवगुणांवर मात करण्यासाठी ज्ञानाचा वापर करण्याचा संदेश भगवान महावीरांनी दिला. त्यांच्या या संदेशातूनच आत्मोन्नतीचा मार्ग दिसून येतो. भगवान महावीर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन चालले, तरच जगात शांतता राहिल, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)
जैन धर्मीयांचे योगदान मोठे
By admin | Published: April 20, 2016 5:37 AM