मुंबई : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्याबद्दल जैन साधूंनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना आज जाहीररीत्या धन्यवाद दिले तसेच हा कायदा संपूर्ण देशात लागू करावा, अशी मागणी केली.‘समस्त महाजन’ या जीवदया, पर्यावरण संरक्षण व मानवकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थेतर्फे षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित एका कार्यक्रमात जैन साधूंनी ही मागणी केली. देशाची अर्थव्यवस्था यंत्रामुळे चालत नाही तर ती पशुधनामुळे चालत असते, असे या वेळी बोलताना जैन आचार्य राजयशसूरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.महाराष्ट्रात चार महिन्यांपूर्वी गोवंश हत्याबंदीचा कायदा करण्यात आला. तब्बल वीस वर्षांनी या कायद्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते यावेळी काळबादेवी अग्निकांडात शहीद झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर, सुधीर अमीन, महेंद्र देसाई व एस. डब्लू. राणे यांच्या कुटुंबीयांना मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी प्रसिद्ध गायक कुमार चॅटर्जी यांनी संगीताचा कार्यक्रम सादर केला.
गोवंश हत्याबंदीचा जैन साधूंना आनंद
By admin | Published: July 13, 2015 1:41 AM