आर्णी (यवतमाळ) : भगवान महावीरांनी तपस्यांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश दिला. या संदेशाने मानव जातीचे कल्याण होईल. जैन धर्म हा विज्ञान निष्ठ असून आज डॉक्टर जे सांगतात तेच हजारो वर्षापूर्वी भगवान महावीरांनी सांगितले, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी तप आराधिका प.पू. विशालप्रभाजी म.सा. यांच्या बेले बेले पाचवे वर्षीतपाच्या पारणा महोत्सवात केले.यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, आ. ख्वाजा बेग, नांदेडचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, मिठालाल कांकरिया, लोकमत मीडिया प्रा.लि.नागपूरचे संचालक (परिचालन) अशोक जैन, कन्हैय्यालाल रुणवाल प्रमुख पाहुणे होते. खा. दर्डा म्हणाले, आम्ही येथे वर्षीतप पारणा महोत्सवात नमन करायला आलो. या कार्यक्रमातून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जैन धर्म हा विज्ञान निष्ठ असून या धर्मातील प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेली आहे. सायंकाळपूर्वी जेवण करा, गरम पाणी प्या हे हजारो वर्षापूर्वी महावीरांनी सांगितले. आज तेच तत्व डॉक्टर मंडळी उत्तम आरोग्यासाठी सांगतात. प.पू. प्रीतीसुधाजी म.सा. यांचा नागपुरात तब्बल सहा महिने चातुर्मास कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही सूचविलेल्या विविध विषयांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दिशा दिली. त्यांच्या प्रवचनाला तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहरावसुद्धा आले होते. मांसाहाराला विरोध करण्यात आला. मांसाहाराच्या विरोधात मी संसदेत ४० मिनिटे भाषण दिले. प.पू. विशालप्रभाजी म.सा. यांना उसाचा रस देऊन वर्षीतपाची सांगता झाली. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी पारणाची बोली लावली. जैन श्रावक संघाद्वारे प.पू. विशालप्रभाजी म.सा. यांना तपतेजस्वीनी पदवी देण्यात आली. पुलगाव येथील कांताबाई कांतीलाल लुंकड यांच्यासह राज्याच्या विविध भागातील ४५ आराधकांच्या वर्षीतपाचे पारणे झाले. वर्षीतप म्हणजे एक दिवस उपवास आणि एक दिवस भोजन असे अखंड वर्षभर केले जाते. सर्वप्रथम हे तप आदिनाथ भगवान यांनी केले होते. हीच परंपरा आजही सुरू असून अक्षय तृतीयेच्या दिवशी उसाच्या रसाने पारणे केले जाते. खा. दर्डा यांच्या हस्ते प्रभाकिरण विशेषांकाचे प्रकाशन झाले. (प्रतिनिधी)
जैन धर्म हा विज्ञान निष्ठ धर्म
By admin | Published: April 23, 2015 4:59 AM