गणेश वासनिक/ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 29 - पेंच अभयारण्यांतर्गत येणाऱ्या उमरेड-करांडा अभयारण्यातून चार महिन्यांपासून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी राज्यातील वनांमध्ये बुधवारी मोहीम आटोपली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी, उपवनसंरक्षक ते मुख्य वनसंरक्षक असा अहवालाचा प्रवास राहणार आहे. या अहवालात ‘जय’च्या अस्तित्वाची माहिती राहणार आहे. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत वनपाल, वनरक्षकांनी जंगलात पायी वारी करून ‘जय’बाबतचे पुरावे गोळा करण्यासाठी शोधमोहीम पूर्ण केली आहे. ९ एप्रिल २०१६ रोजी ‘जय’ दिसल्याची नोंद वनविभागात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘जय’ हा कधीही वनकर्मचारी अथवा पर्यटकांना दिसला नाही. ‘जय’ या वाघाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर असताना पेंच अभयारण्य क्षेत्रसंचालकांनी ही माहिती राज्य शासन अथवा प्रधान मुख्य वनसचिवांना का दिली नाही? याबाबत वनविभागात तर्कवितर्क लावले जात आहे. भंडारा- गोंदियाचे खा. नाना पटोले यांनी ‘जय’ कुठे आहे? हा मुद्दा उपस्थित करून वनविभागाच्या कारभारावर बोट ठेवले. त्यानंतर ‘जय’ गायब झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ‘जय’चा विषय प्रकर्षाने हाताळावा लागला. केंद्राकडे ‘जय’संदर्भात सीबीआय चौकशी करण्याची तयारीदेखील वनमंत्री मुनगंटीवार यांनी दर्शविली. केंद्र आणि राज्य शासन ‘जय’ गायब झाल्याबाबत गांभीर्याने घेत असताना वनविभाग मात्र हा विषय ‘हलक्याने’ घेत असल्याचे वास्तव आहे. ९ एप्रिलनंतर ‘जय’ दिसून आला नाही. ही बाब वरिष्ठांनी पाच महिने का लपवूून ठेवली, यामागे बरेच काही दडले असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात गायब झालेला वाघ निदर्शनास येत नसताना आता पाच महिन्यांनंतर शोधमोहीम म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा वनविभागाचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत शोधमोहीम राबविताना ‘जय’ पेंच सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागपूर रेंज पहिला टप्पा आटोपल्यानंतर राज्यभरात जंगल, व्याघ्र प्रकल्पांमध्ये तीन दिवस विशेष सूक्ष्म निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. मात्र, या तीन दिवसांत कुठेही ‘जय’बाबतचे ठोस पुरावे आढळले नाहीत. ‘जय’ राज्यातील कोणत्याही जंगलात नसेल तर तो गेला कुठे? याचा खुलासा केव्हा आणि कोण करणार, हा सवाल आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आदी भागात विस्तीर्ण जंगलांमध्ये वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी ‘जय’चा शोध घेण्यासाठी सर्च आॅपेरशन केले असले तरी काहीच पुरावे मिळालेले नाहीत.स्थानिकांवर संशयाची सुईउमरेड-करांडा अभयारण्यातून पाच महिन्यांपूर्वी गायब झालेल्या‘जय’चा अद्यापही शोध लागू शकला नाही. सर्च आॅपरेशन, विशेष शोधमोहीम, तपासकार्य आदी बाबी पूर्ण करूनही ‘जय’चा पत्ता लागला नाही. त्यामुळे ‘जय’बाबत स्थानिकांवर संशयाची सुई वनविभागाने वळविली आहे. वनविभागाच्या रेकॉर्डवर असलेल्या स्थानिक शिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करांसोबत स्थानिकांचे संबंध त्यानिमित्ताने शोधून काढले जाणार आहेत. ‘‘जिल्ह्यातील चारही वनपरिक्षेत्रस्तराहून ‘जय’ची शोधमोहीम आटोपल्यानंतरचा अहवाल अप्राप्त आहे. सूक्ष्म निरीक्षणांती नेमके अहवालात काय समोर येते, ही माहिती वरिष्ठांकडे पाठविली जाईल.
- हेमंत मीना,उपवनसंरक्षक, अमरावती