राजापूर : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध दाखविण्यासाठी शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिक रविवारी रात्री पावणेआठ वाजण्यास सुमारास प्रकल्पस्थळी घुसले आणि त्यांनी आतील काम बंद पाडले. यंत्रे बाहेर काढायला लावली. शिवसैनिकांनी अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. प्रकल्पस्थळी कोणतीही यंत्रे येऊ देणार नाही, अशी भूमिका घेत हा हल्लाबोल करण्यात आला .पोलिसांनी मात्र असा काही प्रकार झाला नसल्याची भूमिका घेतली आहे.रविवारी सायंकाळी अचानक हा प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर, राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश कुवळेकर, राजा काजवे, राजन कोंडेकर, अभिजित तेली, अमर आडिवरेकर, मंगेश मांजरेकर, दीपक नागले यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिक प्रकल्पस्थळी दाखल झाले. प्रवेशद्वारावर वाद घालून त्यांनी जबरदस्तीने आतमध्ये प्रवेश केला.प्रकल्पस्थळी काम सुरू असल्याची माहिती साळवी यांना मिळाली होती. त्यांनी काम कोठे सुरू आहे, याची माहिती घेत तेथे जाऊन जेसीबीचालकाला अटकाव केला. काम करणाऱ्यांना ते बंद करण्यास भाग पाडले. जेसीबी व अन्य काही यंत्रे त्यांनी कंपनीच्या गेटबाहेर काढायला लावली. हा प्रकार सुरू असताना प्रकल्पस्थळावरून तत्काळ नाटे पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. नाटेच्या सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी सर्वांना प्रकल्पस्थळावरून बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत या प्रकाराबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (प्रतिनिधी)संभ्रम दूर करण्यासाठी ?जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही, विरोध स्थानिकांचा आहे आणि शिवसेनेचा स्थानिकांना पाठिंबा आहे, असे मत शनिवारी शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या प्रकल्पाबाबतच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठीच शिवसेना आमदार राजन साळवी यांनी हा हल्ल्याचा स्टंट केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.जैतापूर प्रकल्पाविषयी शिवसेनेच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. मात्र, आमचा प्रकल्पाला ठाम विरोध आहे आणि तो विरोध दाखविण्यासाठी आम्ही हे काम बंद पाडले आहे. - राजन साळवी, आमदारजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थळी मी तत्काळ भेट दिली. मात्र, जेसीबी चालकाला मारहाण करणे किंवा काम बंद पाडणे, असा कोणताच प्रकार घडलेला नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. एवढेच आमदार राजन साळवी यांनी येथे सांगितले. जशा चर्चा सुरू आहेत, तसा कोणताही प्रकार घडलेला नाही.- मेघना बुरांडे, सहायक पोलीस निरीक्षक
जैतापूर प्रकल्पस्थळी सेनेचा हल्लाबोल
By admin | Published: May 24, 2015 11:57 PM