राजापूर (जि. रत्नागिरी) : शिवसेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कायमच विरोध केला आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेपेक्षा काहीही मोठे नाही. यामुळेच संघटित होऊन कुठल्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प हद्दपार करणारच, असे खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी प्रकल्प परिसरातील सोनारगडगा येथे सांगितले.जैतापूर प्रकल्प क्षेत्रात जनहक्क समिती व शिवसेना यांच्या वतीने दोन दिवस धरणे व उपोषण आंदोलन सुरू आहे. राऊत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रकल्पविरोधकांना बळ दिले. त्या वेळी आमदार राजन साळवी, जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजीत चव्हाण, सचिव दीपक नागले, पर्यावरण नेत्या वैशाली पाटील,माजी आमदार गणपत कदम आदी उपस्थित होते. अत्यंत घातक व तेवढाच विनाशकारी प्रकल्प यापूर्वीच्या शासनाने कोकणवासीयांच्या माथी मारला आहे आणि संघटित राहून आपण तो हद्दपार करायचा आहे, असे राऊत यांनी सांगितले. आमदार साळवी यांनी या लढ्यात शिवसेना कायम तुमच्यासमवेत राहील, अशी ग्वाही दिली. वैशाली पाटील यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी याबाबत संसदेत आवाज उठवावा, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)
जैतापूर प्रकल्प हद्दपार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2016 4:50 AM