रत्नागिरी : राज्यातील सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर काय तडजोड होणार, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. पाठिंबा देताना शिवसेना हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ठाम ठेवणार की प्रकल्प होणार ही भाजपची भूमिका ठाम राहणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.देशातील सुमारे १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्माण करणारा प्रकल्प जैतापूर परिसरात आला असून, त्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पातून होणाऱ्या रेडिएशनमुळे भातशेती, बागायती, मासेमारीसह मानवी जीवनावर दुष्परिणाम होतील, या भीतीमुळे इथल्या जनतेचा कडाडून विरोध आहे. शिवसेनेनेदेखील याच मुद्द्यावरुन प्रकल्पाला प्रखर विरोध करत मागील काही निवडणुकांप्रमाणे यंदा ही निवडणूक जिंकली. केंद्रात व राज्यात आमचे सरकार आल्यावर हा प्रकल्प घालवल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन सेनेने प्रकल्पविरोधकांना अनेकदा दिले होते. त्यानंतर केंद्रात भाजपप्रणित एनडीएचे सरकार स्थापन झाले. त्यामध्ये शिवसेना सहभागी आहे. मात्र, भाजपने या प्रकल्पाचे समर्थन केल्याने शिवसेना अडचणीत सापडली होती. विधानसभा निवडणुकीपर्यंत सेनेला जैतापूर प्रकल्प रद्द करता आला नाही. त्याचा लाभ काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्यायला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात तडजोड न झाल्याने युती तुटली आणि अडकित्त्यात सापडलेली सेना सुटली. कारण तुटलेल्या युतीच्या निमित्ताने भाजपवर अणुऊर्जा मुद्द्यावर हल्ला करायला मोकळीक मिळाली होती. पण, ती सेनेने साधली नाही. आता तर भाजपबरोबर शिवसेना सत्ते सहभागी होण्याची वेळ नजिक आली असताना पुन्हा जैतापूरचा मुद्दा पुढे येऊ शकेल असे वाटत आहे. (प्रतिनिधी)
जैतापूर प्रकल्प विरोध कळीचा मुद्दा ठरणार?
By admin | Published: October 22, 2014 10:27 PM