कोल्हापूर : राज्यातील विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी जैतापूर प्रकल्प होणे गरजेचा असून, शिवसेनेचा त्याला पूर्वीपासून विरोध आहे. कोणीही, कितीही विरोध केला तरी हा प्रकल्प करणारच, असा निर्धार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवसेनेने प्रत्येक मुद्द्यावर टीका करीत बसण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. भूकंपग्रस्त नेपाळला मदत केल्याबद्दल शिवसेना व काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले, काँग्रेसने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेना सरकारमध्ये आहे; पण त्यांनी दोन-तीन वक्तव्ये चुकीची केलेली आहे. त्यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या शंका व सूचना स्वीकारण्यास आम्ही तयार आहे. सहा महिन्यांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी स्वत: भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.ग्रामपंचायत पातळीपर्यंत पक्ष पोहोचविण्याचे आदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने हा एक प्रकारचा शिवसेनेला शह नव्हे काय, याबाबत बोलताना दानवे म्हणाले, आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. इतरांनीही ते करावेत. (प्रतिनिधी) अटलजी आमच्या हृदयात कार्यकारिणी बैठकीसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल पोस्टरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो नाही. भाजपा अटलजींना विसरला काय, असा प्रश्न उपस्थित केला असता फोटो नसला म्हणजे त्याचा अर्थ विसरला असे होत नाही. प्रत्येक पक्षकार्यकर्त्याच्या हृदयात अटलजी असल्याचे दानवे यांनी सांगितले. अधिवेशनापूर्वी विस्तारराज्य मंत्रिमंडळ व महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्याने कोणी नाराज नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची घोषणाही दानवे यांनी केली.
जैतापूर प्रकल्प करणारच
By admin | Published: May 24, 2015 1:53 AM