जालना जिल्ह्यालीत आंतरवाली येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. तसेच या कारवाईमुळे पोलीस, गृह मंत्रालय आणि राज्य सरकारविरोतही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या लाठीमार प्रकरणामध्ये राज्य सरकारने मोठी कारवाई केली असून, जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली येथे आंदोलन आणि उपोषण करत असलेल्या आंदोलकांना शुक्रवार १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. हा लाठीमार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याच आदेशावरून झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. तसेच या प्रकरणी कागवाईची मागणीही होत होती. अखेर आज तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, आंतरवाली गावात झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद उमटत असून, मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तसेचा या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.